नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने (BJP) सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेतला. पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशातही मुस्लिम समाज एकजुटीने भाजपच्या संपूर्ण विरोधात मतदान करण्याची चिन्हे असल्याचा फीडबॅक पक्षाला मिळाला आहे. यावर बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली.
भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे. उत्तर प्रदेशसह ५ राज्यांत पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असणार आहेत. यामुळे भाजपने बूथ पातळीपासून तयारीला सुरवात केली आहे. उत्तराखंड व काही प्रमाणात गोव्यात भाजपसाठी म्हणावी तेवढी अनुकूल परिस्थिती नाही. शेतकरी आंदोलनाचा जोर असलेल्या पंजाबमध्ये भाजपसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा प्रस्तावित नव्या पक्षावर भाजपची मदार आहे.
उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वांत महत्वाचे राज्य असून, देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे मानले जाते. भाजपच्या नेतृत्वाने दुसरा पर्याय नसल्याने योगी आदित्यनाथ यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली आहेत. असे असले तरी उमेदवार ठरविण्यापासून सगळ्या गोष्टी दिल्लीतच अंतिम होतील, असे त्यांना आधीच सांगण्यात आले आहे. मूळचे हिंदू महासभेच्या संस्कारात जडणघडण झालेले योगी आदित्यनाथ हे 'एकला चलो' वृत्तीचे आहेत. त्यांच्याशी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व नड्डा हे तिघेच 'संवाद' साधू शकतात, असे भाजपमध्ये बोलले जाते.
उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लिम मतदार आहेत. दिल्लीत आलेल्या फीडबॅकनुसार हे मतदार यावेळी 'पश्चिम बंगाल फॉर्म्यूला' वापरण्याची चिन्हे आहेत. म्हणजे केवळ भाजपला विरोध या एका मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुस्लिम एकजुटीने समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना भरभरून मते देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. लवकरच या मुद्द्यावर दारूल उलूम देवबंद व इतरांकडून फतवेही जारी होतील, अशी शक्यता आहे.
नड्डा यांनी बैठकीत सरचिटणीसांना या आव्हानाची जाणीव करून दिली. या मुद्यावर त्यांच्याकडून आलेल्या सूचनाही नड्डा यांनी ऐकून घेतल्या, असे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सुमारे १०० जागांवर मुस्लिम मते निर्णायक ठरतात. उत्तर प्रदेशातच्या रणधुमाळीत एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हेही उतरले आहेत. बंगालमध्ये ओवेसींची जादू चालली नसल्याने उत्तर प्रदेशातही त्यांचा फारसा प्रभाव राहणार नाही, असे चित्र आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लिम समाजाने मते न फुटण्याची दक्षता घेत त्यांच्यासह डावे, कॉंग्रेलाही धुडकावून लावले होते. त्यांनी सगळी ताकद ममता बॅनर्जी यांच्या मागे उभी केली होती.
मुस्लिम समाजाने एकगठ्ठा विरोधात मतदान केले तर भाजपसाठी ते आव्हान मोठे ठरू शकते. राजकीय विश्लेषक सईद अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार हा प्रयोग यापूर्वी मध्य प्रदेश व इतर काही राज्यांच झाला होता. बंगालमध्ये मात्र, तो ठसठशीतपणे राबविला गेला. साहजिकच उत्तर प्रदेशात मुस्लिमांनी एकजूट दाखविल्यास भाजपला मोठा फटका बसेल. बंगालमध्ये भाजपला भद्र समाजाचा पाठिंबा मिळाला नव्हता. उत्तर प्रदेशात ब्राह्मण व उच्चवर्गीय मतांबाबत तसे घडेलच याची खात्री देता येत नाही, असेही अन्सारी यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.