हिंमत असेल तर मला काँग्रेसमधून काढून दाखवा! कॅप्टनची आता आरपारची लढाई

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी आरपारची लढाई सुरू केली.
Amarinder Singh
Amarinder SinghSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) पायउतार झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी आरपारची लढाई सुरू केली असून, ते सातत्याने काँग्रेस (Congress) नेतृत्वाला आव्हान देत आहेत. त्यांनी आता पक्षातून काढून दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे. त्यांचे कट्टर शत्रू प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना हे आव्हान त्यांनी दिले आहे.

अमरिंदरसिंगांनी यांनी पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अनुभव नसलेले आणि दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. आता त्यांनी सिद्धूंना लक्ष्य करीत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिद्धू हे मूर्ख, जोकर आणि ड्रामाबाज आहेत. सिद्धू हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहेत. ते प्रदेशाध्यक्ष असले तरी मला काही फरक पडत नाही. असे असेल तर त्यांनी मला काँग्रेस पक्षातून काढून टाकावे.

सिद्धू हे ड्रामा करुन केवळ गर्दी जमवू शकतात. त्यांनी गर्दी जमवता आली तरी ते मते मिळवू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्यावर फक्त भटिंडा आणि गुरदासपूरची जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी सिद्धूंनी प्रचार केला पण दोन्ही जागा काँग्रेस हारली. सिद्धू हरोत अथवा जिंकोत मी त्यांना विरोध करीत राहणार आहे. जो एक मंत्रालय चालवू शकला नाही तो पूर्ण पंजाब काय चालवणार?

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे अमरिंदरसिंग हे काँग्रेस सोडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Amarinder Singh
भाजपचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं अन् आठवडाभरातच गुन्हा दाखल

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली. चन्नी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा अद्याप शपथविधी झालेला नाही. मंत्रिमंडळामध्येही सिध्दू यांचंच वर्चस्व असू शकतं, अशी चर्चा आहे. यामुळे अमरिंदरसिंग यांच्या नाराजीत भरच पडत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com