नवी दिल्ली : पंजाबमधील पक्षांतर्गत वादावर तोडगा काढल्यानंतर काँग्रेसने (Congress) इतर राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सचिन पायलट (Sachin Pilot) यांची या आठवड्यात दोन वेळा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पायलट यांच्यावर अतिशय महत्वाच्या अशा गुजरातची (Gujarat) जबाबदारी टाकली जाणार आहे. मोदी-शहांना गुजरातमधून धक्का देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पायलट यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात महत्वाचे पद देण्याचा प्रस्ताव आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी हे राज्य महत्वाचे आहे. यामुळे गांधी भावंडांसोबत पायलट यांची काल बैठक झाली. ही बैठक सुमारे पाऊण तास चालली. या बैठकीत पायलट यांच्या समर्थकांना राजस्थानच्या मंत्रिमंडळात प्राधान्य देण्याची हमीही देण्यात आली. परंतु, पायलट यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांना सांगण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील लोकसभा निवडणुकीआधी देशभरात पुन्हा पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर गुजरात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातवर काँग्रेसचा डोळा आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षात आलेली मरगळ दूर करून पुढील लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी गुजरात महत्वाचे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव झाला तरी जागा वाढवून काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. याच गुजरातमध्ये काँग्रेसने यश मिळवल्यास इतर राज्ये आणि लोकसभा निवडणुकीत चित्र वेगळे दिसेल, असे काँग्रेसला वाटत आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
राजस्थानमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत पायलट यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चमकदार कामगिरी केली होती. त्यांना पक्षाला एकहाती विजय मिळवून दिला होता. पायलट यांचे नाव राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणले जाते. त्यामुळे त्यांना इतरही राज्यांत मानणारा मोठा वर्ग आहे. याचात फायदा घेऊन काँग्रेस त्यांच्यावर गुजरातची जबाबदारी सोपवणार आहे. पायलट हे तरुण असल्याने तरुणांमध्येही ते लोकप्रिय आहेत. याचाही फायदा करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.
पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.