राजकीय फोडाफोडी जोरात! आता दादा, भाऊ समर्थक राष्ट्रवादीत

सत्ता टिकवण्यासाठी भाजपने, तर ती पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने फोडाफोडी सुरु केली आहे.
NCP
NCP

पिंपरी : आगामी महापालिका (PCMC) निवडणूक ठरल्यावेळी होण्याचे संकेत मिळताच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सत्ता टिकवण्यासाठी भाजपने (BJP), तर ती पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फोडाफोडी सुरु केली आहे. त्यात राष्ट्रवादी आज आघाडीवर गेली आहे. काल (ता.२२) भाजपने शिवसेनेचा मोहरा (जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे) टिपला. तर, आज राष्ट्रवादीने भाजपचे तीन शिलेदार पक्षात आणले.

शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांनी काल चिंचवडे यांना भाजपमध्ये आणले. तर, आज त्यांच्याच भावकीतील राष्ट्रवादीच्या राजेंद्र जगतापांनी आमदार जगतापांचे समर्थक अरुण पवार यांना राष्ट्रवादीत आणले. शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेशदादा यांचा तरुण कार्यकर्ता ज्ञानेश्वर बोराडे हाही आज राष्ट्रवादीत आला. प्रभाग रचनेचे संकेत मिळताच शहरात फोडाफोडी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात ती आणखी वाढणार आहे. काल, शिवसेनेचे चिंचवडे यांचा भाजप प्रवेश मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार जगताप यांनी करून घेतला. आज ते चिंचवडेंना घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना भेटायला गेले आणि इकडे त्यांचाच समर्थक पवार राष्ट्रवादीने गळाला लावला.

पवार व बोराडेसह विष्णू शेळके या भाजपच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यानेही मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप,अतुल शितोळे पक्षाचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत वरील तिघांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. अजित पवार आणि राष्ट्रवादीमुळे शहराचा विकास होईल,असे वाटल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला,असे अरुण पवार यांनी मुंबईहून सरकारनामाला सांगितले.

NCP
नगरसेविकेच्या कार्यालयातच विनयभंग झाल्याने भाजप बॅकफूटवर

मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अरुण पवार यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादीने शहरात मोठ्या संख्येने असलेल्या मराठवाड्यातील मतदारांवर जाळे फेकले आहे. अरुण पवार हे भाजपच्या सांगवी-काळेवाडी मंडलाचे माजी अध्यक्ष होते. संघाच्या माध्यमातूनही ते भाजप व त्यातही आमदार जगतापांसाठी काम करीत होते. एकूणच महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातूनच त्यांनी काल पूर्वीच्या आपल्या मित्रपक्षाचा पदाधिकारी फोडला.

दुसरीकडे गेलेली राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी अजित पवारही कामाला लागले आहेत. त्यांनी भाजपमध्ये २०१७ ला गेलेल्या आपल्या मंडळींची घरवापसी करण्याचे ठरवले आहे. नगरसेवकांचे हे घाऊक इनकमिंग वर्ष अखरीस होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाहीत, असे प्रतिस्पर्धी पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेतले जात आहेत. नुकताच पक्षांतरबंदीचा फटका बसणार नाही,असा भाजपशी संलग्न अपक्ष नगरसेवकांचा गटनेता कैलास बारणे यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतले. तर, त्याअगोदर माजी नगरसेवक संतोष बारणे आणि राजू लोखंडे यांच्याही हातावर राष्ट्रवादीने आपले घड्याळ बांधले आहे. या दोघांच्याही पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com