

केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असून, यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे. हा आयोग सध्याच्या वेतन रचनेचा, भत्त्यांचा आणि इतर आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारसी करणार आहे. पुढील 18 महिन्यांच्या आत आयोग आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.
या आयोगाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आयोगाच्या अध्यक्षा असतील. त्यांच्यासोबत पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल. ही तीन सदस्यांची टीम पुढील दीड वर्ष केंद्र कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांचे भविष्य ठरवणार आहे.
या वेतन आयोगाचा मुख्य भर “परफॉर्मन्स बेस्ड वेतन” या संकल्पनेवर असेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार त्याला आर्थिक लाभ मिळू शकतो. जो कर्मचारी चांगले काम करेल, त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ मिळू शकते. सरकारच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, हा आयोग केवळ पगारवाढीसाठीच नव्हे तर सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी कार्य करणार आहे.
या आयोगाच्या कक्षेत फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच नाहीत तर संरक्षण दलाचे सदस्य, अखिल भारतीय सेवा अधिकारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील कर्मचारी यांचा समावेश असेल. आयोग विविध भत्त्यांचा आणि बोनस योजनांचा पुनर्विचार करणार असून, कालबाह्य भत्ते रद्द करण्याच्याही शिफारसी केल्या जाऊ शकतात.
पेन्शन आणि ग्रॅच्युटीविषयीही आयोग सविस्तर शिफारसी करणार आहे. विशेषतः नवीन पेन्शन योजना (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी “डेथ-कम-रिटायरमेंट ग्रॅच्युटी”च्या तरतुदींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच जुनी पेन्शन योजना (OPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये आवश्यक सुधारणा सुचविण्याची शक्यता आहे.
आयोग आपल्या अहवालात देशाची आर्थिक स्थिती, सरकारचा खर्चाचा समतोल आणि राज्यांच्या वित्तीय क्षमतेचा विचार करून शिफारसी करणार आहे. त्यामुळे या आयोगाच्या निर्णयांमुळे केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो. लाखो कर्मचाऱ्यांना आता या आयोगाकडून मोठ्या वेतनवाढीची आशा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.