
New Delhi, 24 February : देशाच्या राजधानीत ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. देशाच्या पंतप्रधानांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि साहित्यिक राजकारण्यांपर्यंत अनेकांनी या संमेलनाला हजेरी लावली. मात्र या दिमाखदार सोहळ्याला राजकारण्यांच्या काही विधानामुळे वादाचे गालबोटही लागले आहे. तसेच, निमंत्रण देऊनही काही केंद्रीय मंत्र्यांनी मराठी साहित्याच्या या उत्सवाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत मराठी सारस्वतांचा मेळा भरला होता. तब्बल 70 वर्षांनंतर दिल्लीत झालेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाले. समारोपाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती.
उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाबरोबरच परिसंवाद आणि इतर कार्यक्रमातही राजकीय नेत्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली. साहित्यिकांचीही मोठी गर्दी तालकटोरा स्टेडियमध्ये दिसून आली. मान्यवरांच्या आणि तज्ज्ञांचे परिसंवाद विशेष लक्षणीय ठरले. मात्र, या परिसंवादातील काही नेत्यांच्या राजकीय विधानामुळे या मराठी सारस्वतांच्या उत्सवाला वादाचे गालबोट लागले.
दिल्लीतील या साहित्य संमेलनाचे उदघाटन पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आले होते. विशेषतः केंद्रात काम करणाऱ्या सर्व मराठी नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना (Union Minister) आयोजकांकडून संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यातील बहुतांश नेत्यांनी साहित्य संमेलनाला वेळात वेळ काढून हजेरी लावली. मात्र, मानाचे निमंत्रण देऊनही दोन केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाला दांडी मारली, त्याची चर्चा संमेलनस्थळी रंगली होती.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साहित्य संमेलनाचे सरकार्यवाह, तर रक्षा खडसे यांना संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष हे पद देण्यात आले होते. मात्र, या दोघांनीही संमेलनाला दांडी मारली आहे. मानाचे पद देऊनही हे दोन्ही केंद्रीय मंत्री तीनही दिवस संमेलनाकडे फिरकले नाहीत, त्यामुळे आयोजकांसह साहित्यिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.