
India-Pakistan News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील तणाव वाढला असून भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. यातच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्यासाठी दिलेला ४८ तासांचा अवधी आज संपत आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे वर्षांनुवर्ष भारतात राहणाऱ्या अनेक नागरिकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच ओडिशा राज्यातील शारदा उर्फ शारदा कुकरेजा यांचाही समावेश आहे.
शारदा कुकरेजा (वय ५३) यांचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला आहे. मागील ३५ वर्षांपासून त्या भारतात राहतात. साधारण 30 वर्षांपूर्वी त्यांचे एका भारतीय उद्योजकाशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्या भारतात राहतात. शारदा यांनी सांगितलं की, त्या त्याच्या चार बहिणी आणि पाच भावांसह १९८७ मध्ये ६० दिवसांच्या व्हिसावर पाकिस्तानातून भारतात पळून आल्या. सुरुवातीला ओडीसा राज्यातील कोरापुट येथे त्यांनी वास्तव्य केले. त्यानंतर बालनगिर येथे त्या स्थायिक झाल्या. त्यांचे सर्व भाऊ आणि बहिणी भारतात विवाहित आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्या ३५ वर्षांपासून बालनगिर येथे राहतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुक्कुर नावाच्या एका शहरात शारदा यांचा जन्म झाला. तिथे त्यांना धर्म परिवर्तन करुन एका मुस्लीम युवकाशी लग्न लावण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. तेव्हा त्या भारतात पळून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भारतात महेश कुमार कुकरेजा यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन अपत्य आहे. त्या दोघांचेही लग्न झाले आहे. शारदा बाईंना एक नातू आणि एक नातदेखील आहे.
शारदा बाईंना लवकरात लवकर देश सोडून जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. तसेच मुदत दिलेल्या तारखेच्या आत देश सोडून न गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांना पोलिसांनी दिलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.
देश सोडावा लागणार असल्याच्या भितीने शारदा यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की, त्यांना त्यांच्या पती व मुलांपासून वेगळं करु नये. जर भारत सरकारने मला पाकिस्तान मध्ये पाठवलं तर मी तिथे कुठे जाणार? माझे आता तिथे कुणीही नाही. १९८७ नंतर मी कधीही पाकिस्तानमध्ये गेली नाही. कुणासोबत मी फोनवरही कधी बोलले नाही. पाकिस्तान सोबत माझे कोणतेही नाते राहिलेले नाही. पाकिस्तानने माझ्या व माझ्या परिवाराला कोणतीही सुरक्षा दिली नाही असं त्यांनी सांगितलं.
भारताचे नागरिकत्त्व मिळावे म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असा त्यांनी दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंडांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे असं त्या सांगतात. शारदा यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पण व्हिसा नाही. गेल्या तीस वर्षांपासून त्या भारतात राहात असल्या तरी भारतीय नागरिकत्त्व नसल्यामुळे त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान ओडीसा राज्यात आतापर्यंत १२ पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली आहे. त्यांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शारदाबाई यांचे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.