पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी हजेरी लावली होती. आज दुपारी त्यांचे गोव्यात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी फोंडा, सावर्डे आणि वास्को याठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तसेच सावर्डेमध्ये घरोघरी जावून प्रचार केला. भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात म्हणजेच मागच्या १० वर्षात गोव्याचा विकास झाला आहे आणि आता समृद्धीकडे वाटचाल करताना गोल्डन गोवा संकल्पना साकारण्यासाठी भाजपला सहकार्य करा, असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी बोलताना केले.
अमित शहा यांच्या गोव्यातील आजच्या तिन्ही सभांमधील भाषणांची वैशिष्ट्ये म्हणजे सुरुवात गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या स्मरणाने झाली होती. शहा यांनी आपल्या बोलण्यात सातत्याने मनोहर पर्रीकरांचा उल्लेख ठेवला. ठराविक वेळानंतर शहा यांनी पर्रीकरांचा उल्लेख करत त्यांनी जनतेसाठी आणि गोव्यासाठी केलेल्या कामाची आणि पक्षाशी असलेल्या एकनिष्ठेची आठवण करून दिली. मनोहर पर्रीकरांनी गोल्डन गोव्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांचे स्वप्न आता आपण पुर्ण करूया असे म्हणत त्यांनी जनतेला डबल इंजिन सरकारचे महत्व पटवून दिले.
मात्र अख्या देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या पर्रीकर पुत्र उत्पल (Utpal Parrikar) यांचे नाव अमित शहा यांनी कुठेही घेतले नाही. त्यांच्या बंडखोरीचा साधा उल्लेखही त्यांनी कोणत्याही भाषणात केला नाही किंवा त्यांना दिवसभरात भेटण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. मात्र त्यानंतरही आता अमित शहा आज रात्रीत काही खेळ बदलवणार का? उत्पल यांच्याशी संवाद साधून पर्रीकर पुत्राची मनधरणी करणार का? त्यांच्याशी काही चर्चा करणार का? आणि उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या काही वेगळे चित्र पाहयला मिळणार का? असे काही प्रश्न उपस्थित होतं आहेत.
मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. उत्पल हे पणजी मतदारसंघातून भाजपकडून तिकीटासाठी आग्रही होते. मात्र भाजपने याठिकाणी विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे. गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पल यांना पणजी वगळता इतर दोन मतदारसंघाची ऑफर दिली होती. मात्र या सगळ्या ऑफर नाकारत उत्पल यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. मात्र आता स्वतः अमित शहा गोव्यात आल्याने आणि उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काही वेगळ्या घडामोडी पहायला मिळणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.