PM Modi News: महाराष्ट्रातली आमची प्रगती उत्तमच; आता राज्याला आणखी पुढे नेण्याची माझी 'गॅरंटी'

Lok Sabha Election 2024: मला आज काल लोक विचारतात, की इंडिया आघाडीचे हा ‘एक वर्ष-एक पंतप्रधान’ हे सूत्र काय आहे? त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे? देशाचे नेतृत्व करणारा गट त्यांनी तयार केला आहे का? या प्रश्‍नांची त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नाहीत.
PM Modi News Lok Sabha Election 2024
PM Modi News Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

'सकाळ माध्यम समुहाचे' व्यवस्थापकीय संचालक आणि 'एपी ग्लोबाले'चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार (Abhijit Pawar) यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, अध्यात्मिक, विकासात्मक अशा विविध विषयांवर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी मनमोकळा संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) झालेल्या या चर्चेतला वेचक भाग वाचा पुढे...

निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, अशा वेळी तुमच्या दृष्टिकोनातून भाजपची कामगिरी कशी झाली आहे आणि मतदानातून जनतेने कोणता संदेश दिला आहे?

पहिले दोन्हीही टप्पे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी (एनडीए) अभूतपूर्व ठरले आहेत. देशातील जनता, विशेषत: युवकवर्ग, महिला आणि शेतकरी ते अत्यंत स्पष्ट संदेश देत आहेत, की आम्हाला फक्त विकास, विकास आणि विकासच हवा आहे.

मतपेढीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि अस्थैर्य - जी इंडिया आघाडीची तत्त्वे आहेत, हे सर्व जनतेला अजिबात नको आहे. जे सरकार आपल्या कल्याणासाठी काम करेल, ज्या सरकारमध्ये नेतृत्वाबाबत अजिबात संभ्रम नाही आणि ज्या नेतृत्वाने आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे, असे सरकार जनतेला हवे आहे.

मला आज काल लोक विचारतात, की इंडिया आघाडीचे हा ‘एक वर्ष-एक पंतप्रधान’ हे सूत्र काय आहे? त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे? देशाचे नेतृत्व करणारा गट त्यांनी तयार केला आहे का? या प्रश्‍नांची त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नाहीत.

देशातील गरीब जनतेने आमच्या सरकारचे काम पाहिले आहे आणि ते म्हणतात, की आमच्या सरकारने मागील दहा वर्षांत जे साध्य केले, ते काँग्रेसला त्यांच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळातही करता आलेले नाही.

तर मग आम्ही पुन्हा एकदा काँग्रेससाठी मत वाया का घालवायचे? भारतातील जनता घराणेशाहीविरोधातही अत्यंत स्पष्टपणे संदेश देत आहे. निवडक कुटुंबांनीच जनतेवर नियंत्रण ठेवावे, हे त्यांना मान्य नाही. आपल्या भवितव्याला आकार देणारे सरकार सत्तेत हवे, अशी जनतेची इच्छा आहे. आपल्याला जसा विकास हवा आहे, तो घडवून आणणारे सरकार त्यांना हवे आहे. आणि केवळ ‘एनडीए’मध्येच ती क्षमता आहे, अशी त्यांची भावना आहे. म्हणूनच, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतून मला फारच शुभसंकेत मिळत आहेत आणि आगामी टप्प्यांमध्येही असेच संकेत मिळतील, याची मला खात्री आहे.

महाराष्ट्रातील तुमच्या सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल?

एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सत्तेची सूत्रे स्वीकारली होती. २०२२ मध्येही कोरोना संसर्गाची आणि आधीच्या दोन वर्षांत झालेल्या हानीची भीती लोकांच्या मनात कायम होती.

पण त्याहून अधिक म्हणजे, आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील धोरण लकवा दूर करण्याचा अतिरिक्त अडथळा या सरकारला पार करायचा होता. सरकारच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वच जनतेसाठी उपलब्ध नसणे, यातूनच हा धोरण लकवा आला होता.

कारण, अनेक महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी ते त्यांच्या निवडक लोकांमध्येच अडकून पडल्याचे दिसून आले होते. आपापसांतील वादांच्या ताणामुळेच ही आघाडी कोसळत होती. त्याचा परिणाम म्हणून विकास प्रकल्पांना त्याचा फटका बसत होता. लोक अत्यंत त्रस्त आणि अस्वस्थ झाले होते.

शिवाय, महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला होता, त्याला जनादेशाचा कोणताही आधार नव्हता, हेदेखील लोक विसरले नव्हते. शिवसेनेचे सहकार्य असलेले भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येण्यासाठी त्यांनी मतदान केले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताबदल झाला. आमचे सरकार सत्तेत येताच पायाभूत सुविधांचे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्यास वेग आला. तुमच्या लक्षात आले असेल, मागील दोन वर्षांत महाराष्ट्रात राज्य कारभारात ठळकपणे लक्षात येण्यासारखी सुधारणा झाली आहे.

अत्यंत स्पष्टपणे जाणवणारा फरक म्हणजे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर दिलेला विशेष भर. आपण फक्त मुंबई शहराचाच विचार केला, तरी या शहरात ‘अटल सेतू’च्या रूपाने समुद्रावर बांधलेला देशातील सर्वांत अधिक लांबीचा पूल आहे.

या पुलामुळे आपण खऱ्या अर्थाने मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणले आहे. मुंबई मेट्रोचे कामही सुरू आहे, ते जवळपास पूर्णत्वाला आले असून काही टप्प्यांचे तर उद्‌घाटनही झाले आहे. यानंतर, कोस्टल रोडही जनतेसाठी अंशत: खुला करण्यात आला आहे. मुंबई शहराच्या ऐन मध्यावर निर्माण करण्यात आलेला हा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुनाच आहे. या रस्त्यामुळे मुंबईकरांसमोरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

पुण्यात तर मी स्वत: २०२३ मध्ये पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्‌घाटन केले होते. पुण्यात लवकरच नवीन विमानतळही असेल. पुणेकर याची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते आणि त्यामुळे हा शहराला जोडणाऱ्या दळणवळण सुविधेत मोठी वाढ होणार आहे.

याशिवाय, मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग (हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) आहेच. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवासाचे अंतर सात ते आठ तासांनी कमी होऊन ही दोन शहरे एकमेकांच्या जवळ आली आहेत.

हे सर्व प्रकल्प दहा वर्षांपूर्वी फक्त कागदावर होते किंवा मंत्रालयाच्या फायलींमध्ये धूळ खात पडले होते. ते सर्व आता पूर्ण होत आहेत किंवा पूर्ण होऊन त्यांचा वापरही सुरू झाला आहे. याचा महाराष्ट्रातील जनतेचे ‘राहणीमान सुलभ’ होण्यावर खूपच मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे.

दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांसारख्या दुर्लक्षित समाजघटकांना लाभ देणाऱ्या योजनांचीही अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याचेही आपल्याला दिसते. केंद्र सरकारशी रचनात्मक सहकार्य केले जात असल्याने या विकासकामांना बळ मिळत असून यातूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची देदीप्यमान कामगिरी दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com