

Vajpayee Advani BJP strategy : देशाचे 11 वे राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी 2002 मध्ये शपथ घेतली होती. ते 2007 पर्यंत या पदावर होते. पण त्यांना हे पद मिळण्याआधीच भाजपच्या अंतर्गत गोटात घडलेल्या घडामोडींची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कलाम यांचे नाव पुढे येण्याआधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपची राष्ट्रपती पदासाठी पहिली पसंती होती.
वाजपेयी यांचे तत्कालीन मीडिया सल्लागार अशोक टंडन यांनी ‘अटल संस्मरण’ या आपल्या पुस्तकात हा मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाने तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना राष्ट्रपती करण्यासाठी आणि लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान बनविण्याचा प्रस्ताव दिला होता. पण वाजपेयी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता, असा दावा टंडन यांनी केला आहे.
टंडन हे १९९८ ते २००४ यादरम्यान वाजपेयींची मीडिया सल्लागार होते. त्यामुळे त्यांच्या दाव्याला महत्व प्राप्त झाले आहे. टंडन यांच्या पुस्तकानुसार, वाजपेयींचे म्हणणे होते की, एखाद्या पंतप्रधानांनी बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती बनने भारतीय संसदीय लोकशाहीसाठी योग्य संकेत असणार नाही. त्यामुळे वाजपेयी त्यासाठी अजिबात तयार नव्हते. त्यातून चुकीचा पायंडा पडेल. अशा कोणत्याही निर्णयाचे समर्थन करणारे आपण शेवटचे व्यक्ती असू, असे वाजपेयींचे म्हणणे होते, असा दावा टंडन यांनी केला आहे.
वाजपेयी यांनी सर्वसंमतीने राष्ट्रपती पद देण्यासाठी तयारी सुरू केली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग सहभागी झाले होते. याच बैठकीत वाजपेयी यांनी एनडीएकडून एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार बनविण्याचे निश्चित केल्याचे सांगितले.
कलाम यांचे नाव घेतल्यानंतर बैठकीमध्ये काँग्रेस नेते अवाक झाले होते. सोनिया गांधी यांनी आपण त्यामुळे गोंधळून गेल्याचे बैठकीत म्हटल्याचा दावा टंडन यांनी केला आहे. आपल्याकडे पाठिंबा देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. पण या प्रस्तावावर चचा करून निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. त्यानंतर कलाम यांना २००२ मध्ये एनडीए आणि विरोधकांच्या पाठिंब्याने ११ वे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.
टंडन यांनी आपल्या पुस्तकात वाजपेयी आणि अडवाणी यांच्या मैत्रीविषयीही लिहिले आहे. काही व्यक्तिगत मतभेदांनंतर दोन्ही नेत्यांचे संबंधित कधीही सार्वजनिक जीवनात खराब झाले नाहीत. अडवाणी नेहमी अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख माझे नेते आणि प्रेरणास्त्रोत असा करत होते. तर वाजपेयी त्यांना अतुट सोबती असा करत होते, असा दावा टंडन यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.