Ayodhya News : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यात चारही शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दोन शंकराचार्यांनी सोहळ्याला थेट विरोध दर्शवला आहे. शंकराचार्यांची ही भूमिका सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडणारी आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेससह (Congress) इतर काही पक्षांनी भाजपवर (BJP) आरोप करीत सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याला राजकीय रंग दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सोहळ्यात सहभागी न होण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर भाजपचे नेते तुटून पडले आहेत. काँग्रेस हिंदूविरोधी असल्याची टीका केली जात आहे. (Shankaracharya Criticism)
काँग्रेसनेही शंकराचार्यांचा मुद्दा पुढे करून भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, प्राचीन भारतीय सनातन परंपरेच्या विकासात आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारात शंकराचार्यांचे महान योगदान आहे. त्यांनी सनातन परंपरा पूर्ण देशात पसरवण्यासाठी भारताच्या चार ठिकाणी शंकराचार्य मठांची स्थापना केली. हे चारही शंकराचार्य नाराज असून त्यांनी भाजपच्या प्रपोगंडाचा बहिष्कार केला असून ते अयोध्येला जाणार नाहीत. आता भाजप शंकराचार्यांना हिंदूविरोधी घोषित करणार का, असा सवाल श्रीनेत यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसच्या निर्णयाला शंकराचार्यांच्या भूमिकेमुळे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी हा सोहळा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप घेतला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना न केल्यास त्यात भूत-पिशाच्च वास करतात, असे निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे, तर अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करणे शास्त्रविरोधी असल्याची भूमिका स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मांडली आहे.
शंकराचार्य स्वामी भारती कृष्णतीर्थ आणि शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती हेही सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. पण स्वामी भारती कृष्णतीर्थ यांनी सोहळ्याला आपला विरोध असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे मठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण त्यांच्या उपस्थितीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. स्वामी सदानंद सरस्वती यांनीही सोहळ्याला पाठिंबा दिला असला तरी न जाण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. याचेच भांडवल करीत आता काँग्रेसकडून भाजपवरच पलटवार केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.