नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभेतील विजयाची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षपदी जाट नेते भूपेंद्र सिंह (Bhupendra Singh) यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू करून देतानाच भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने ही जबाबदारी अखेर अनुभवी पक्षनेते व सध्या पंचायती राज्य मंत्री असलेले भूपेंद्र सिंह यांच्यावर सोपवली आहे.
उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्या वेळेस "यूपी अधिक योगी- फारच उपयोगी" ही घोषणा प्रत्यक्षात आणून दाखविल्यावर भाजप नेतृत्वाने अनेक महिने रखडलेल्या प्रदेशाध्यक्षपदाचा पेचही सोडविला आहे. दरम्यान, भाजपने त्रिपुरा प्रदेशाध्यक्षपदी राजीव भट्टाचार्य यांची तसेच हिमाचल प्रदेशाच्या निवडणूक प्रभारीपदी खासदार सौदान सिंह यांची तर सहप्रभारी म्हणून देवेंद्रसिंह राणा यांचीही नियुक्ती आज केली. (Bhupendra Singh, UP BJP Latest News)
लोकसभेच्या २०२४ च्या रणधुमाळीच्या तयारीला लागलेल्या भाजपने या व पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेचीही समांतर तयारी सुरू केली आहे. पक्षाचे महासचिव अरूण सिंह यांच्या स्वाक्षरीनिशी व पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नावाने आज दुपारी पावणेतीन वाजता उत्तर प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षपदी भूपेंद्र सिंह यांची नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, माजी उर्जामंत्री श्रीकांत शर्मा, कन्नौजचे खासदार सुब्रत पाठक, केंद्रीय मंत्री बी एल वर्मा आदींच्या वाचीही चर्चा होती. मात्र पश्चिम उत्तर प्रदेशात अजूनही भाजपवर नाराज असलेल्या जाट मतपेढीला सांभाळण्यासाठीची जातीय व सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन वीरेंद्र सिंह यांचे नाव अखेर दिल्लीतून निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्रात भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद नुकतेच सोपविले. मात्र उत्तर प्रदेशातील पेच अडकला होता. माजी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या दुसऱया टीममध्ये सामील करून घेतले. त्यानंतर एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपला २०१९ ची लोकसभा व यावर्षीची विधानसभा निवडणूक जिंकण्यास हातभार लावणारे स्वतंत्र देव सिंह यांनी १६ जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर नवीन नियुक्ती न झाल्याने त्यांच्याकडेच कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता.
दोन निवडणुकांत फेरविजय मिळाल्यावर भाजप नेतृत्वाने त्यांना योगी मंत्रिमंडळात सामील करून घेण्याचे ठरविले तेव्हा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, हा सवाल उपस्थित झाला होता. यासाठी भाजप नेतृत्वाच्या मनात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे नाव होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्लीत बोलावून घेण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यावर मौर्य यांनी, ‘सरकारपेक्षा पक्षसंघटना मोठी‘ असे ट्विट केल्याने त्यांनाच प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावे लागणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र मोर्य व योगी आदित्यनाथ यांची ‘जमलेली जोडी‘ लोकसभा निवडणुकीआधी फोडण्याचे दिल्लीचे प्रयत्न तेव्हा थंडावले जेव्हा याबाबत दोघांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. योगी यांचे मत डावलणे भाजप नेतृत्वाला शक्य नाही. तशातच ओबीसी मतपेढीवर पकड असलेले मौर्य यांना सरकारमधून अचानक हटवून कोणताही अपशकुन करू नये, हा विचार पक्षनेतृत्वाला पटला. त्यानंतर भूपेंद्र सिंह यांच्या नावाबाबत गंभीरपणे विचार सुरू झाला. आझमगड दौऱ्यावर असलेले भूपेंद्र सिंह यांना तो दौरा अर्धवट टाकून दिल्लीत तातडीने येण्यास सांगितले गेले. काल ते दिल्लीत आले व त्यांनी सर्वश्री शहा, नड्डा, संघटनमंत्री बी एस संतोष यांच्याशी चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.