Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये कोण ठरणार ‘किंग मेकर’? सगळे फासे योग्य पडले पाहिजेत ..

Bihar Assembly elections Nitish Kumar, Tejashwi Yadav Rahul Gandhi : बहुप्रतीक्षित बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची विचारचक्रे गतिमान झाली आहेत. त्यांच्या मनातील विचार म्हणजेच त्यांची स्वगते आपण जाणून घेऊयात...
Bihar Assembly Election 2025
Bihar Assembly Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

नितीशकुमार - चला एकदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मला बिहारची निवडणूक वगैरे आहे याचाच विसर पडत चालला होता. त्या ‘कमळाबाई’चे  बिहार प्रभारी (त्यांचं नावही मी वारंवार विसरतो) मला सतत निवडणुकीची आठवण करून देतात. चला निवडणूक आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे आता कोणत्याही ‘रेवड्या’ उधळण्याची गरज नाही. नाही तर ते भाजपवाले रोज काही ना काही टुमणं लावून कुठली ना कुठली घोषणा मला करायला लावायचेच. वैताग आला होता नुसता. आता माझ्या मुलाकडे सोपवावं.

त्याचं नावही माझ्यासारखंच काही तरी आहे. हां आठवलं. निशांत (फार त्रास होतोय, आज काल आठवताना)  निशांतला  आता पाहू दे सर्व. पण भाजपवाले ऐकत नाहीत. ते ‘नमो’ आता बिहारला चकरा मारत होते. आता तर त्यांचे दौरे वाढतील. ते आल्यावर तर माझी फारच दगदग होते. सतत रोड शो, उघड्या वाहनातून जनतेला अभिवादन करत जावं लागतं. मी नावालाच असतो. सगळा ‘नमो नमो सोहळा’ असतो.

आम्ही आपले भालदार-चोपदाराप्रमाणे त्यांच्या शेजारी उभे असतो. असो. आता निवडणूक म्हंटल्यावर  हे करावं लागणार. नाही म्हणायला बिहारमध्ये जवळपास २० वर्षे सीएमपदावर काढली की मी. लालूजींना मागं  टाकलंय मी याबाबतीत. आता जरा थकल्यासारखं वाटतंय. (सारख्या आघाड्या बदलूनही धाप लागलीये म्हणा) पण ‘कमळाबाई’ स्वस्थ बसू देणार नाही मला. निवडणुकीआधी ती मला ‘सीएम’ म्हणून पसंत करेल अन् नंतर भलत्याच्याच गळ्यात माळ घालेल. माझा ‘बाण’ आता अचूक लागला पाहिजे. 

लालूप्रसाद यादव - आता थकलो असलो तरी माझी तब्येत ठीक आहे आता. मध्ये जरा चारा वगैरे खाल्ल्याने मामला बिघडला होता. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या देवाणघेवाणीचा (खरं तर घेवाणीचाच) व्यवहार तेजीत होता. आता  सर्व व्यवसाय थंड पडला. घरातही थोडी यादवी  झाली. सगळेच तेज असल्यानं नाईलाज होता. या मुलांना सगळं माझ्याकडूनच  पाहिजे. माझ्या मुलीनं मात्र खरं कर्तव्य निभावलं. अन् बापाला चक्क किडनीदान केली.

आज मी तिच्यामुळेच मी बरा झालोय. शरीर थकलंय पण डोकं शाबूत आहे माझं. बिहारच्या सीएमप्रमाणे डोकं फिरलेलं नाही माझं. फार दिवस खुर्ची अडवून बसलाय तो. आता त्याला खाली खेचलाच पाहिजे. बिहारमध्ये पार्टी कोणतीही जिंको. हाच गडी मुख्यमंत्री व्हायचा. कधी इकडं तर कधी तिकडं. याच्यापेक्षा सरडा परवडला.

एवढ्या वेगात यानं रंग बदललेत. ते पाहून आमचे चेहरे पांढरे फटक पडले.  ते काही नाही आता  आमचा कंदील झळकला पाहिजेच. त्या युवराजाचा पंजा एक वेळ हाती घेऊ पण बिहारमध्ये आमच्या कंदिलाचाच  उद पाडू यंदा. नंतर त्या ‘पंजा’ला कंदिलाचा चांगला चटका देऊ, तो भाग वेगळा. आता मात्र महागठबंधन राहिलंच पाहिजे.

Bihar Assembly Election 2025
Gokul Milk Politics: महायुतीत मिठाचा खडा! ऐन दिवाळीत गोकुळमध्ये राजकीय फटाके फुटणार...

तेजस्वी यादव - त्या ‘पंजा’वाल्यासह फिरणं म्हणजे मोठं दिव्य आहे. पण आता महागठबंधन केलंय म्हंटल्यावर नाईलाज आहे. त्यांचा ‘हात’ हाती घेऊन अवलक्षण तर ओढवून घेतलं नाही ना, असं कधी कधी वाटतं. त्यांच्यापेक्षा प्रशांत किशोर यांच्याशी आघाडी फायद्याची ठरली असती का असं आता वाटतंय. त्यांनी चांगलंच नाकी नऊ आणलंय.

त्यांना आपल्या कंपूत घ्यावं लागेल. ‘एनडीए’ अन् आमच्या महागठबंधनच्या नादात प्रशांत यांचा ‘जनसुराज’ बाजी मारेल की काय, अशी भीती वाटू लागलीये. त्यांच्‍या ‘शाळेच्या दफ्तरा’च्या ओझ्याखाली आम्ही दबून जातो की काय, याची धाकधूक लागून राहिलीय मला. तेजप्रताप भैय्यांनी जनशक्ती जनता दलाद्वारे ‘ब्लॅक बोर्ड’वर राजकारणाची मुळाक्षरे गिरवायला सुरुवात केली आहेत. त्यांनाही तोंड द्यावं लागेल.

तेजप्रताप यादव - माझा जनशक्ती जनता दल पक्षच खरा जनता दल आहे. अन् मीच अस्सल यादव आहे. लालूंचा वारसदार आहे. (राजकारणातला. भ्रष्टाचारातला नव्हे) याबाबत त्यांच्याकडे मोठे ‘तेजस्वी’ लोक आहेत. पण खरं ‘तेज ’आणि खरा ‘प्रताप’ माझाच आहे. बिहारच्या राजकारणात आमचा ‘ब्लॅक बोर्ड’ ठसा उमटविणार. मीच बाजी मारणार.

प्रशांत किशोर - माझा सगळा अभ्यास पूर्ण झालाय. अख्खा बिहार मी उभा-आडवा पालथा घातलाय. आमचा ‘जनसुराज’ बिहारमध्ये उलथापालथ घडविणार आहे. मी अस्सल बिहारी आहे. खरा रणनीतीकार आहे. या बिहारमध्ये मी खरा ‘किंग मेकर’ ठरणार आहे. बिहारच्या सीएमवर मीच अंकुश ठेवणार. कुणीही सत्तेवर आले तरी चावी ‘जनसुराज’कडे राखण्याची तयारी मी पूर्ण केली आहे. सगळे फासे योग्य पडले पाहिजेत फक्त.

चिराग पासवान - या निवडणुकीत तरी मला ४५ ते ५४ जागा हव्याच आहेत. आमच्याकडे खरी ‘लोक जनशक्ती’ आहे. अखेर ‘एनडीए’चा मी जुना मित्र आहे. सध्याचे ‘सीएम’ मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. बिहारचा खरा ‘चिराग’ मीच आहे. पण मला ही ‘कमळाबाई’ नेहमीच अंधारात ठेवते. यंदा माझं ‘हेलिकॉप्टर’ उडलंच पाहिजे.

विनोद तावडे - यावेळी माझे फासे अचूक पडले पाहिजेत. त्या वसई-विरारला महाराष्ट्रात ऐन निवडणुकीत पैसे वाटपप्रकरणी वादात अडकलो. पक्षानं प्रभारी म्हणून बिहारच दाखवलं. आता पवनसिंग, मैथिली ठाकूर या गायकांच्या हातात ‘कमळ’ दिलं आहे. मलाही राजकारणात सूर गवसले पाहिजेच आता...‘नमो नमो’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com