
Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीनंतर गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली असा दावा महायुतीतील सर्वच नेते करीत आहेत. महाविकास आघाडीतील व महायुतीतील लोकप्रतिनिधींकडून गोकुळ दूध संघामध्ये शाहू आघाडीचीच सत्ता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मात्र मागील आठवड्यात गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरकाबाबतच्या रकमेची घोषणा केल्यानंतर यंदाची दिवाळी जोरात होईल असे चित्र तयार होत असताना डीबेंचरच्या मुद्द्यावरून महायुतीत राजकीय फटाके फुटणार आहेत. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दूध उत्पादक आणि दूध संस्थांच्या बाजूची भूमिका घेतल्यानंतर डीबेंचर वादाला अधिक धार आली आहे. मात्र गोकुळमधील सत्ताधारी गटाने शांततेची भूमिका घेतली आहे.
गोकुळ दूध संघातील संस्था चालकांकडून यंदा संघाने डीबेंचरची रक्कम 40% घेतल्याने संस्थाचालकांमध्ये संघाच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त होत संताप व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी हाच मुद्दा घेऊन संस्थाचालकांनी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना घेराव घातला. त्यावेळी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक देखील उपस्थित होत्या. एकंदरीतच नुकतीच गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मंत्री मुश्रीफ यांनी संचालिका महाडिक यांना महायुती म्हणून सहकार्य करण्याची विनंती केली असताना हा सुप्त संघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे.
सर्वसाधारण सभेत संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतलेली भूमिका आणि डीबेंचरच्या मुद्द्यांवरून घेतलेल्या भूमिकेवरून गोकुळ प्रशासनाला जबाबदार धरत असले तरी त्याचा रोख हा गोकुळच्या सत्ताधारी गटातील नेत्यांवर असल्याचे दिसून येते. या मुद्द्याला चार ते पाच उलटल्यानंतरही सत्ताधारी गटातील एकाही नेत्याने यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण होण्याचा अंदाज आहे.
मोठा गाजावाजा करत गोकुळ दूध संघाने दिवाळी बोनस म्हणून दूध उत्पादक सभासदांना १३६ कोटी रुपयांचे फरक बिल अदा केला. पण त्यातील तब्बल ४०% रक्कम डिबेंचर म्हणून कपात केली. संस्था चालकांनी यावर आक्षेप घेत आमची रक्कम आम्हाला परत करा अन्यथा गाई म्हशींसह गोकुळवर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. १० ऑक्टोबरपर्यंत यावर मार्ग काढला नाही तर सभासदांसोबत आंदोलन छेडण्याचा भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाच्या प्रशासनासह सत्याधार्यांना घेण्याचा डाव आणि वातावरण निर्मिती करण्याची संदीप विरोधकांकडे चालून आली आहे. त्यामुळे सहाजिकच हा प्रश्न निकाली नाही लागला तर विरोधक रस्त्यावर उतरतील. त्यातून पुन्हा सत्ताधारी गटाचे नेते विरुद्ध महाडिक असा संघर्ष सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात गोकुळच्या राजकारणाला आणखी धार येईल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.