
Clashes Break Out Outside Congress Office : बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मतदार अधिकार यात्रा सुरू आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी यात्रेदरम्यान एका काँग्रेस कार्यकर्त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर शुक्रवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालायावर हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या पटना येथील कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हल्ला केला. भाजपचे कार्यकर्त्यांनी सकाळीच काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाजप समर्थक जमा झाले होते. याठिकाणी पोलिसही बंदोबस्तासाठी हजर होते. पण काही वेळात भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले.
सुरूवातील कार्यकर्त्यांनी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यावेळी कार्यालयात हजर असलेल्या काँग्रेस समर्थकांची मोठी धावपळ उडाली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपच्या काही समर्थकांनी गेट तोडून कार्यालयात प्रवेश केला. आवारात गेल्यानंतरही दगडफेक सुरूच होती. काही कार्यकर्त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी आवारात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, अशी माहिती काँर्गेस नेत्यांनी दिली.
दगडफेकीमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून एका कार्यकर्त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याचेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले. यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही पक्षांच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून बाजूला केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्द वापरणाऱ्या कार्यकर्त्याला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. रिझवी असे या व्यक्तीचे नाव असून तो दरभंगा येथील आहे. राहुल गांधी यांच्या रॅलीदरम्यान स्टेजवरून त्याने मोदी व त्यांच्या आईविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी राहुल गांधी, तेजस्वी यादव स्टेजवर उपस्थित नव्हते.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, ही बाब केवळ निंदनीय नाही, तर आपल्या लोकशाहीला कंलकित करणारी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजकारणाने खालचा स्तर गाठला आहे. एका गरीब आईचा मुलगा मागील 11 वर्षांपासून पंतप्रधानपदावर बसल्याचे त्यांना सहन होत नाही. हा प्रत्येक आईचा, मुलाचा अपमान आहे, त्यासाठी 140 कोटी देशवासी त्यांना कधीही माफ करणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.