New Delhi : विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये पहिला मोठा डाव टाकला आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपने बिहार प्रदेशाध्यक्षांना घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले तावडे बिहारचे प्रभारीही आहेत. त्यामुळे त्यांचा हा निर्णय बिहारमधील पक्षाची रणनीती ठरवणारा मानला जात आहे.
भाजपने सम्राट चौधरी यांच्याजागी राज्यातील मंत्री डॉ. दिलीप जयस्वाल यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवले आहे. चौधरी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिही आहेत. बिहारमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 12 जागांवर विजय मिळाला आहे. त्यांच्या तुलनेत नितीश कुमार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे.
बिहारमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा ठपका सम्राट चौधरी यांच्यावर ठेवला जात होता. तसेच ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतले जाणार, अशी चर्चा होती. लोकसभेत त्यांच्या कुशवाह समाजातील मतेही भाजपला मिळाली नाहीत. त्यामुळे चौधरी यांच्याविषयीची नाराजी वाढत चालली होती.
चौधरी यांना हटवताना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जातीचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे. जयस्वाल यांना राज्याचे प्रमुखपद देऊन भाजपने वैश्य व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. कुशवाहा व्होट बँक राष्ट्रीय जनता दलाकडे गेल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे वैश्य समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजपने राजस्थानातही प्रदेशाध्यक्ष बदलले आहे. सी. पी. जोशी यांच्याजागी राज्यसभेचे खासदार मदन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोननंतर माघार घेतल्याचा दावा त्यांनीच केला होता. त्यामुळे राठोड यांनी माघार घेतली होती. त्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.