
Impact on Lalu Prasad Yadav and RJD Support Base : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तेजप्रताप यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यताही मिळाली असून चिन्हही देण्यात आलेले आहे.
लालूप्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वीच तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच कुटुंबातूनही त्यांना बेदखल करण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांतच तेजप्रताप यांनी नव्या पक्षाचे संकेत दिले आहेत. आता भारतीय निवडणूक आयोगाकडून तेजप्रताप यांच्या नव्या पक्षावर शिक्कामोर्तब केले आहे.
जनशक्ती जनता दल असे त्यांच्या पक्षाचे नाव असून ब्लॅक बोर्ड हे चिन्ह पक्षाला देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक या चिन्हावरच लढणार असल्याचे तेजप्रताप यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियातून दिली आहे. आम्ही लोक बिहारच्या संपूर्ण विकासासाठी समर्पित असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तेजप्रताप यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेल्या फोटोवर लालूप्रसाद यादव आणि आई राबडीदेवी यांचे फोटो नाहीत. त्यामुळे तेजप्रताप आता खुलेपणाने राष्ट्रीय जनता दलाविरोधात राजकीय मैदानात उतरले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांच्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाला दणका बसणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
तेजप्रताप हे आरजेडीतून हकालपट्टी करण्याआधीपर्यंत सक्रीय होते. त्यामुळे आरजेडीमध्ये त्यांना मानणाराही एक वेगळा वर्ग होता. आता त्यांनी नवा पक्ष काढलेल्या सर्व समर्थक या पक्षात दाखल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सध्यातरी प्रामुख्याने आरजेडीचे टेन्शन वाढणार आहे. तेजप्रताप यांच्या भगिनी रोहिणी आचार्य या सध्या आरजेडीमध्ये असल्या तरी त्याही नाराज आहेत. आगामी काळात त्याही तेजप्रताप यांच्यासोबत आल्यास नवल वाटायला नको.
लालूंच्या कुटुंबात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच तेजप्रताप बाहेर पडले असून रोहिणी आचार्य याही बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघणारे तेजस्वी यादव एकाही पडू शकतात. लालूंना त्यांच्या प्रकृतीमुळे निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होता येणार नाही. त्यामुळे तेजस्वी यांना कुटुंबातील काही सदस्यांसह राजकीय विरोधकांसोबतही लढावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.