पाटणा : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीमुळे खर्च कमी करण्यासाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्याने थेट घोड्यावरून वीजबिल वसुली सुरू केली होती. पेट्रोल परवडेना म्हणून घोड्यावरून सुरू केलेली वसुली उलट त्याला आणखी महागात पडली आहे. यामुळे त्याच्या नोकरीवरच आता गदा आली आहे. (Petrol Diesel price hike News)
बिहारमधील शिवहर जिल्ह्यातील जाफरपूर गावातील वीज विभागाचे कर्मचारी अभिजित तिवारी यांनी वीजबिल वसुलीसाठी चक्क घोड्यावर मांड ठोकली होती. घोड्यावर बसून वीजबिल वसुली करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अभिजित तिवारींचे वडील शिवशंकर तिवारी यांना घोडे पाळण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांना घोड्यावर बसून ही वसुली करणे शक्य झाले होते. मात्र, त्यांच्या विभागाला अशा प्रकारे घोड्यावरून वीजवसुली करण्याचा प्रकार पटला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
तिवारींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वीज विभागाने याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. याचबरोबर कार्यकारी अभियंत्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. अखेर तिवारी यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी हा स्टंट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तिवारी हे कंत्राटी कर्मचारी असल्याने त्यांना तातडीने सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.
या अनोख्या प्रयोगाबद्दल तिवारी म्हणाले होते की, पेट्रोलचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे दुचाकी चालवणे आता परवडत नाही. घोड्याला रोज लागणाऱ्या खाद्याच्या तुलनेत पेट्रोलचा खर्च दुपटीने महाग आहे. वीजबिलाच्या वसुलीसाठी मला बरेच फिरावे लागते. त्यात दररोज २५० रुपये पेट्रोलसाठी खर्च येतो. घरी घोडा असल्याने मला घोडेस्वारी करता येते. म्हणून महाग पेट्रोल गाडीत भरण्यापेक्षा वसुलीसाठी घोड्यावर जाणे मी पसंत करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.