पुणे : महाराष्ट्र सरकारने रविवारी पेट्रोलवरील मुल्यवर्धित कर (VAT) २.०८ रुपये तर डिझेल वरील कर १.४४ रुपयांनी कमी केला. त्याच्या आदल्यादिवशीच केंद्र सरकारनेही उत्पादन शुल्क कमी करत देशभरातील सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. पण राज्य सरकारने केलेली कपात ही धूळफेक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. भाजपचे प्रवक्ते अली दारूवाला (Ali Daruwala) यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Fuel Price Latest Marathi News)
दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचेही प्रवक्ते आहेत. त्यांनी राज्य सरकारने केलेल दर कपातीवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या मनात दोन शंका उपस्थित झाल्या. कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्याची व्यावसायिक सवय स्वस्थ बसू देत नव्हती. पहिली शंका म्हणजे महाराष्ट्र सरकार जर VAT टक्केवारीत लावते तर दरात कपात रुपयांमध्ये कशी दिली? दुसरी शंका म्हणजे कपात राउंड फिगरमध्ये कशी नाही?' (Petrol Diesel Price Latest Marathi News)
नक्की काही तरी मेख आहे याची खात्री पटली. केंद्र सरकार एक्साईज ड्युटी प्रति लिटर लावते. टक्केवारीत नाही. म्हणून नोव्हेंबर आणि मे मध्ये कपात केली ती प्रति लिटर केली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे पेट्रोलवर VAT २६ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात २५ टक्के आहे. डिझेलवर VAT अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के आहे. पेट्रोलवर सेस १०.१२ रुपये तर डिझेलवर ३ रुपये आहे. महाराष्ट्र सरकारला कर कपात करायची होती तर त्यांनी VAT ची टक्केवारी कमी करायला हवी होती किंवा सेस कमी करायला हवा होता. तसे काही केल्याचे वाचनात आले नाही, असं दारूवाला यांनी सांगितले.
राज्य सरकार ज्या किंमतीवर VAT लावते, ती किंमत कमी झाली आहे. म्हणून VAT कमी झाला. आणि त्या प्रमाणात प्रति लिटर भाव कमी होणारच होते. राज्याने काहीही दिलासा दिलेला नाही, असा दावा दारूवाला यांनी केला आहे. केंद्र सरकारने एक्ससाईज कमी केल्यामुळे राज्याला पेट्रोल ८ रुपये स्वस्त पडेल. त्यावर ग्राहकांना २६ टक्के VAT कमी लागेल. करा हिशोब. उत्तर २.०८ येते. ६ रुपये स्वस्त डिझेल आणि २४ टक्के VAT नुसार उत्तर १.४४ येते. घोषणा करताना टक्केवारी मुंबईची घेतली आहे, असं दारूवाला यांनी स्पष्ट केलं आहे.
जो दिलासा आम्ही दिला म्हणून ढोल वाजवले जात आहेत तो खरा केंद्र सरकारमुळेच मिळाला आहे. राज्याने एक नवा रुपयाचाही दिलासा दिलेला नाही. जर राज्य सरकारला लोकांची खरोखरच चिंता असती तर VAT ची टक्केवारी घटवली असती किंवा सेस कमी केला असता. लोकांची काळजी कोणाला आहे? एक्ससाईज ड्युटी कमी करणाऱ्या मोदी सरकारला की त्या कमी केलेल्या ड्यूटीमुळे कमी झालेल्या VAT चे श्रेय वाजत गाजत स्वतःला घेणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला? हमे बेवकूफ समझा क्या, असा सवाल दारूवाला यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.