नवी दिल्ली : आगामी वर्षात उत्तरप्रदेशसह, पंजाबसारख्या ५ महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणूका होत आहेत. याच पार्श्वभुमीवर आज राजधानी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला पक्षाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा देखील उपस्थित होते. त्यांच्याशिवाय इतर जवळपास ३४२ नेते यात सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत असलेले केंद्रीय मंत्री आणि सदस्य प्रत्यक्षात हजर झाले. तर इतर सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीला उपस्थित राहिले.
सध्या ५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. याशिवाय या निवडणुकांच्या निकालांचे परिणाम २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर होणार आहेत. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार या राज्यांमधील सत्ता कायम राखण्यासाठी काय करावे लागेल याबाबतचे मार्गदर्शन आणि रणनिती याची सविस्तर चर्चा आजच्या कार्यकारणीत पार पडली. सोबतच सध्याच्या मुद्द्यांवर संकल्प आणि प्रस्ताव मंजुर केले गेले.
पंजाब निवडणूकांवर जास्त फोकस?
आगामी काळात ५ राज्यांमध्ये निवडणूका होत असल्या तरी भाजपने आजच्या बैठकीमध्ये पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी य बैठकीच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या अनेक यशस्वी योजनांचा उल्लेख केला. मात्र यावेळी त्यांनी शीख समाजासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, मी इथे ४ गोष्टींचा उल्लेख करु इच्छितो, ज्या पुर्णत: शीख समाजातील बंधूंशी संबंधीत आहेत.
मोदी सरकारने शीख गुरुद्वारा, शीख सामाजिक संस्थांना एफसीआरएच्या ग्रँटची परवानगी दिली. यापूर्वी एफसीआरए ग्रँट नसल्याने शीख समाजाला अनुदान मिळण्यात अडचणी येत होत्या. याआधी लंगरवर जीएसटी आकारला जायचा, जो मोदी सरकारने आता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच १२० कोटी रुपये खर्च करून करतारपूर कॉरिडॉर पूर्ण करत शीख समाजाची मागणी पूर्ण करण्याचे काम केले. १९८४ च्या दंगलीचा संदर्भ देत प्रधान म्हणाले, निर्धारित वेळेत तपासासाठी एसआयटी स्थापन करून अहवालाच्या आधारे दोषींना शिक्षा देण्याचे काम मोदी सरकारने केले. १९८४ नंतर ३१४ लोकांना ब्लॅक लीस्ट करण्यात आले होते, त्यापैकी दोन वगळता इतर सर्वांची नावे त्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.