नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनमधील खारकीव्हमध्ये (Kharkiv) केलेल्या हल्ल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा 1 मार्चला मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (Naveen Shekharappa Gyanagoudar) असे होते. अखेर तब्बल 21 दिवसांनी नवीनचे पार्थिव भारतात आणण्यात आले आहे. नवीनचे देहदान करण्याचे पाऊल त्यांच्या आई-वडिलांना उचलले आहे. यामुळे वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत होणार आहे.
नवीनचे पार्थिव आज पहाटे 3 वाजता बंगळूर विमानतळावर पोचले. तेथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पार्थिवाचे दर्शन घेतले. नंतर तेथून ते रुग्णवाहिकेतून हावेरीतील त्याच्या गावी सकाळी 9 वाजता पोचले. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह सरकारी अधिकारी नवीनच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हजर होते. नवीनचे वडील शेखरप्पा आणि त्याच्या आईला अश्रू आवरता आले नाहीत. नवीनवर वीरशैव लिंगायत धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्काराचे विधी करण्यात आले. त्यानंतर त्याचे देहदान दावणगिरीतील एस.एस.मेडिकल कॉलेजला करण्यात आले.
याबाबत बोलताना नवीनचे वडील शेखरप्पा म्हणाले की,त्याला लहानपणपासून डॉक्टर बनून समाजाची सेवा करायची होती. परंतु, देशातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तो वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही त्याचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुढील पिढ्यांना संशोधन करता येईल आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईल. माझ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून माझे सांत्वन केले होते. माझ्या मुलाचे पार्थिव लवकरात लवकर आणण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले होते.
नवीन हा बावीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला होता. नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला होता. किव्हमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले होते. पण त्याआधीच खारकीव्हमध्ये नवीनचा मृत्यू झाला होता. रशिया-युक्रेन युध्दामध्ये नवीन हा पहिला भारतीय बळी ठरला होता. त्यामुळे भारतासाठी ही मोठी नामुष्की ठरली होती. (Russia-Ukraine War)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.