Delhi News : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये विजयपथावर पथसंचलनासह देशाच्या विविधेमधील एकतेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध राज्यांकडून केले जाणारे चित्ररथाचे सादरीकरण हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे प्रत्येक राज्याकडून आपल्या चित्ररथाचे प्रदर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र, यावेळी पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या चित्ररथांचा समावेश करण्यास केंद्र सरकारकडून नकार देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पंजाबमधील आम आदमी पार्टी (Aam Adami Party) आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) हा झटका समजला जात आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक विरोधातील सत्ताधाऱ्यारी राज्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आता केंद्र सरकारकडून या दोन्ही राज्याचे चित्ररथाला परवानगी नाकारण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पंजाब आणि पश्चिम बंगालच्या चित्र रथाला परवानगी नाकारण्याचे कारण देताना केंद्राने म्हटले, या दोन्ही राज्याचे चित्ररथाची परवानगी ही प्रजासत्ताक दिनी चित्ररथाचे सादरीकरण करण्यासाठी जी नियमांवली जारी केली होती त्या नियमांच्या अधीन राहून नाकारण्यात आली आहे. या दोन्ही राज्याचे चित्ररथ हे या वर्षी निश्चित करण्यात आलेल्या थीमला अनुसरुन नव्हते. त्यामुळे त्या राज्याच्या रथाच्या सादरीकरणाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
देशभरातून 30 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातून चित्ररथाच्या सादरीकरणाचे प्रस्ताव येत असतात.त्यातील निवडक 16 ते 17 राज्यांच्या रथांचीच सादरीकरणासाठी निवड केली जाते, असेही स्पष्टीकरण केंद्र सकारकडून देण्यात आले आहे. पंजाबच्या चित्ररथा सदंर्भात चित्ररथाच्या निवड समितीने तीन राऊंड घेतले होते. त्यामध्ये पंजाबच्या चित्ररथाचा समावेश होता. मात्र, त्यानंतरच्या अंतिम राऊंडमध्ये पंजाबच्या चित्ररथाचा विचार केला गेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पश्चिम बंगालच्या चित्ररथाबाबत तर पहिल्या दोन राऊंडमध्येच विचार करण्यात आला. मात्र, त्यांच्या चित्ररथाच्या सादरीकरणाचा विषय हा थीमला अनुरुप नसल्याने तो तिसऱ्या फेरीपूर्वीच बाहेर काढण्यात आला. तसेच आम्ही कोणत्याही राज्याशी राजकीय भेदभाव करत नसल्याचे सांगताना म्हटले, की गेल्या आठ वर्षात पंजाबचा 6 आणि पश्चिम बंगालचा 5 वेळा चित्ररथाचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सादरीकरणासाठी समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आत्ताचा निर्णय केवळ एक प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, यंदा महाराष्ट्राकडून प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
(Edited By : Sachin Waghmare)