Chhattisgarh Assembly Elections Results in Marathi : छत्तीसगडमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये पाटन विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण या मतदारसंघातून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे पुतणे विजय बघेल यांनी चौथ्यांदा आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काकाचा राजकीय अनुभव पुतण्याला आसमान दाखवणार की, पुतण्याच बाजी मारणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सद्यःस्थितीत मतमोजणीच्या कलानुसार या ठिकाणी काका-पुतण्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
दोघांमध्ये आघाडी-पिछाडीची चुरस
पाटन विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे भाजपचे उमेदवार असलेले त्यांचे पुतणे विजय बघेल यांच्या दोघामध्ये चुरशीची लढत होताना दिसून येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दोघेही आघाडी आणि पिछाडीवर जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोघांचीही धाकधूक वाढली आहे. विजय बघेल हे लोकसभेच्या दुर्ग मतदारसंघातून भाजपचे खासदार असून, भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
चौथ्यांदा आमने सामने
छत्तीसगडमध्ये होणारी ही काका-पुतण्याची लढत चौथ्यांदा होत आहे. आजपर्यंतच्या लढतीमध्ये भूपेश बघेल यांनी 2003 मध्ये पुतण्या विजय बघेल यांचा पराभव केला होता. त्यावेळी विजय बघेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर मात्र 2008 च्या निवडणुकीमध्ये विजय बघेल यांनी काका भूपेश यांचा 7500 मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यावेळी 2013 मध्ये पुन्हा एकदा काका पुतणे आमने सामने आले होते. मात्र, यावेळी पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2018 च्या निवडणुकांमध्ये भाजपने भूपेश बघेल यांच्या विरोधात मोती लाल साहू यांना मैदानात उतरवले होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या भूपेश बघेल यांनी साहू यांना पराभवाची धूळ चारली होती. तसेच त्या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा पाटन मतदारसंघातून काका पुतण्याची चुरशीची लढत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपची आघाडी
दरम्यान, या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतमोजणीमध्ये हाती आलेल्या कलाची आकडेवारी पाहिली असता काँग्रेस सध्या पिछाडीवर ( Chhattisgarh Election Result 2023 ) असून, भाजप आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याचा जो आत्मविश्वास होता, त्या विश्वासाला तडा गेल्याचे दिसून येत आहे. परंतु सद्यःस्थितीत या ठिकाणी अटीतटीची लढत होताना दिसून येत असून, बहुमताचा आकडा कोणता पक्ष गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Edited by Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.