Chhattisgarh Result News : नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल हा छत्तीसगडचा ठरला. कारण, या ठिकाणी काँग्रेसच पुन्हा सत्तेत येणार असं सांगितलं जात होतं.
शिवाय एक्झिट पोलमध्ये तसं स्पष्टपणे दर्शवलं गेलं होतं. मात्र त्या ठिकाणी भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का देत भूपेश बघेल यांना सत्तेतून खाली उतरवलं. छत्तीसगडमध्ये भाजपाने 54 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं, तर काँग्रेसला 35 जागांवरच समाधान मानावं लागलं.
छत्तीसगडमधील एका मतदारसंघाच्या निकालाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ते ठिकाण म्हणजे बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी मजूर असलेल्या ईश्वर साहू यांनी भूपेश बघेल सरकारमधील कृषिमंत्री आणि तब्बल सातवेळा आमदार राहिलेल्या रविंद्र चौबे यांना पराभूत करत एकप्रकारे इतिहासच घडवला. विशेष म्हणजे ईश्वर साहू यांनी या अगोदर कधीच कोणती निवडणूक लढवली नव्हती, ही त्यांची पहिलीच निवडणूक होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईश्वर साहू यांनी भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि 5 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांना तब्बल 1,01,789 मतं मिळाली. तर रविंद्र चौबे यांना 96,593 मतं मिळाली. दोघांमध्ये 5196 मतांचं अंतर राहीलं.
निवडणूक प्रचाराच्या कालावधीत भाजपने बेमेतरा आणि कवर्धा येथे सामाजिक हिंसाचार, धर्म परिवर्तनाच्या मुद्य्यांवरून काँग्रेसला घेरले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपने रायपूरपासून 110 किलोमीटर दूर बीरनपूर येथील रहिवासी असलेल्या आणि मजुरी करणाऱ्या ईश्वर साहू यांना उमेदवारी दिली होती. ईश्वर साहू यांचा मुलगा दंगलीत मारला गेला होता. भाजपने स्थानिक जनतेची भावना लक्षात घेतली आणि परिणामी ईश्वर साहू यांनाही मतदारांनी पाठिंबा दर्शवत विजयी केलं.
साजा येथे प्रचारादरम्यान अमित शाह यांनी सांगितले होते की, ईश्वर साहू केवळ उमेदवारच नाही, तर न्यायाच्या लढाईचे प्रतीक आहेत. जर भाजपा सत्तेत आली तर त्यांच्या मुलाच्या मारेकऱ्यांना तुरुंगात पाठवलं जाईल.
साजा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकणाऱ्या ईश्वर साहू यांच्या मुलाचा मृत्यू साजा विधानसभा क्षेत्रात एप्रिल 2023 मध्ये झालेल्या दंगलीत झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार ही एका शाळेत घडलेली मारहाणीची घटना होती, जिचे नंतर दंगलीत रुपांतर झाले होते. त्या दंगलीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये ईश्वर यांचा मुलगा भुवनेश्वर साहू याचा समावेश होता.
या घटनेनंतर छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारने भुवनेश्वरच्या कुटुंबाला मदत म्हणून सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र ईश्वर साहू यांनी ही मदत नाकारली होती आणि यानंतरच मग भाजपने त्यांना थेट विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.