अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) जिल्ह्यांची संख्या एकाच दिवशी दुप्पट होणार आहे. सध्या राज्यात 13 जिल्हे असून आता हा आकडा 26 वर पोहचणार आहे. त्यामुळे राज्यात इतिहास घडणार आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) हे सोमवारी (ता. 4) 13 जिल्ह्यांचे उदघाटन करणार आहे.
आंध्र प्रदेशमधील मंत्रिमंडळाची (Cabinet) येत्या सात एप्रिल रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन जिल्ह्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवलं आहे. आता नवीन जिल्ह्यांची निर्मिती करून ते आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होणार आहे. या अधिकाऱ्यांनी चार तारखेपासून जिल्ह्यांची जबाबदारी घेऊन कामकाज सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सोमवारी लोकांच्या सोयीसाठी जिल्ह्यांचे पोर्टल आणि हॅन्डबुकचे अनावरण केले जाणार आहे. ता. 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करणार आहेत. रेड्डी यांनी जिल्ह्यांच्या निर्मितीचा सातत्याने आढावा घेतला आहे. एकाचवेळी 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करून त्यांनी प्रशासकीय कामकाजात सुसुत्रताही आणली असल्याने नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.