

हैदराबादमधील एका रस्त्याला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच मांडला आहे. यावर भाजप नेते आक्रमक झाले आहेत .
ट्रम्प यांच्या नावावर रस्त्याचे नाव ठेवण्याच्या तेलंगणा सरकारच्या निर्णयावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपने काँग्रेस सरकारवर ऐतिहासिक आणि स्थानिक अस्मितेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. रस्त्याला परदेशी नेत्याचे नाव देण्याऐवजी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आधी हैदराबाद शहराचे नाव बदलून 'भाग्यनगर' करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. हा प्रस्ताव आता अधिकृत मान्यतेसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळील एका हाय-प्रोफाइल रस्त्याचे नाव 'डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू' असे ठेवण्यात येणार आहे. जगात एखाद्या रस्त्याला विद्यमान अमेरिकी अध्यक्षाचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हैदराबाद शहराला 'जागतिक केंद्र' म्हणून ब्रँडिंग देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि तितकाच वादग्रस्त निर्णय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, हैदराबादमधील महत्त्वाच्या रस्त्यांची नावे जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती आणि कॉर्पोरेशन्सच्या नावावर ठेवण्यात येणार आहेत.
'तेलंगणा रायझिंग ग्लोबल समिट'पूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याची 'इनोव्हेशन-आधारित' ओळख बळकट करणे आणि विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणे, हा यामागील मुख्य उद्देश तेलंगणा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हैदराबादमध्ये शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या राजकारण्यांच्या आणि जागतिक कंपन्यांच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवण्याची परंपरा आहे. एका नवीन ग्रीनफिल्ड रस्त्याला आदरणीय उद्योगपती रतन टाटा यांचे नाव दिले जाणार आहे. गुगलच्या आगामी सर्वात मोठ्या कॅम्पसजवळील रस्त्याला 'गुगल स्ट्रीट' असे नाव दिले जाईल. याशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि विप्रो यांच्या नावावरही जंक्शन आणि रस्त्यांची नावे ठेवण्याचा काँग्रेस सरकारचा प्रस्ताव आहे.या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना भाजपने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारवर टीका केली आणि म्हटले की, रेवंत रेड्डी हे ज्या गोष्टी ट्रेंड करतात त्यानुसार ठिकाणांची नावे बदलतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.