लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावरच भाजपला (BJP) आठवडाभरात जोरदार धक्के बसले आहेत. तीन मंत्र्यांसह सात आमदारांनी राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. याची दखल पक्ष नेतृत्वालाही घ्यावी लागली आहे. पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार ओबीसी (OBC), दलित समाजातील आहेत. या सात जणांनी शुक्रवारी समाजवादी पक्षात (Samajwadi Party) प्रवेश केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) एका दलित कार्यकर्त्यांच्या घरी खिचडी खात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धरम सिंग सैनी यांच्यासह पाच आमदारांनी शुक्रवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मागील चार दिवसांत या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आणखी काही मंत्री व आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीत मागील दोन उमेदवारांच्या नावांवर बैठकांचे सत्र सुरू असताना राज्यात नेते पक्ष सोडून जात होते. सर्वांनीच अखिलेश यांचा हात धरल्याने भाजपला धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाजप व समाजवादी पक्षातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.
ओबीसी, दलित समाजातील नेत्यांनी एकाचवेळी पक्ष सोडल्याने भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. या समाजातील मते समाजवादी पक्षाकडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री योगी यांनी शुक्रवारी थेट दलित कार्यकर्त्याचं घऱ गाठलं. मकर संक्रातीनिमित्त तिथं त्यांनी कार्यकर्त्यासोबतच खिचडी खात सण साजरा केला. यातून योगींनी बंड केलेल्या आमदारांसह विरोधकांना संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, मकर संक्रातीनिमित्त अनुसूचित जातीतील कार्यकर्ते अमृत लाल भारती यांनी घरी खिचडी खाण्यासाठी निमंत्रित केल होतं. सामाजिक मुद्दांवर ते काम करत आहेत. आज त्यांनी या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याच्या मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम झाला.
दरम्यान, योगींच्या या 'खिचडी डिल्पोमसी' मागे राजकीय हेतू असल्याची जोरदार चर्चा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी भाजप सरकारवर दलित, ओबीसी विरोधी असल्याची टीका केली आहे. सरकारने या समाजासाठीही काहीही काम केले नाही, असा आरोपही या नेत्यांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर योगींनी शुक्रवारी थेट दलित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन भोजन केल्याने चर्चा सुरू झाली आहे. आता याचा मतदारानावर किती परिणाम होणार, हे पाहण्यासाठी 10 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.