
New Delhi News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसकडून आयोगाकडे तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला होता. त्यावर आयोगाने प्रत्येक तक्रारीचे उत्तर दिले. त्यानंतर आता काँग्रेसने मोठा निर्णय घेतला असून एक Eagle नावाने एक समिती स्थापन केली आहे.
देशात मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने ही समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील माजी मंत्री नितीन राऊत यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासह या समितीमध्ये आठ सदस्य आहेत. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेते आणि तज्ज्ञांची सशक्त कार्य़ समूह स्थापन केला आहे. ही समिती सर्वात आधी महाराष्ट्रातील मतदार यादीतील हेराफेरीच्या मुद्द्याचे विश्लेषण करेल आणि त्याचा अहवाल तातडीने नेतृत्वाला सादर करेल.
महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांतील मागील काही निवडणुकांचे विश्लेषणही समितीकडून केले जाईल. आगामी निवढणुका तसेच देशात मुक्त वातावरण व निष्पक्षपणे निवडणुका पार पडाव्यात, आदी मुद्द्यांवरही ही समिती देखरेख ठेवणार आहे. समितीमध्ये राऊत यांच्यासह अजय माकन, दिग्विजय सिंह, अभिषेक सिंघवी, प्रविण चक्रवर्ती, पवन खेडा, गुरदीप सिंह सप्पाल आणि चल्ला वामशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ही समिती स्थापन केले आहे. त्यामुळे या समितीचे दिल्लीच्या निकालाकडेही बारकाईने लक्ष राहणार आहे. महाराष्ट्रातील बदललेला ट्रेंड, मतदारयादीतील घोळ, ईव्हीएम बॅटरीचा मुद्दा याचा अभ्यास करून इतर राज्यांतील निवडणुकींच्या निकालाची तुलना केली जाईल. त्यामध्ये आता दिल्लीचीही भर पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.