नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election) काँग्रेसनं (Congress) कंबर कसली आहे. राज्यात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसकडून जोर लावण्यात आला असून सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लखीमपूर खीरी येथील घटनेसह मागील काही महिन्यांत उत्तर प्रदेशात घडलेल्या इतर घटना, समस्यांबाबत त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता त्यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी डाव टाकला आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या एकूण उमेदवारांपैकी 40 टक्के उमेदवार महिला असतील, अशी घोषणा प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. महिलांना 40 टक्के तिकीटे देण्याचा निर्णय उन्नाव येथील बलात्कारपिडीतेसाठी, हाथरसमधील न्याय न मिळालेल्या पिडीतेसाठ, लखीमपूर खीरीमधील भेटीत पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मुलीसाठी घेतल्याचे प्रियांका म्हणाल्या.
उत्तर प्रदेश पुढे नेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा निर्णय असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केलं. मला गराडा घालत सीतापूर येथील गेस्ट हाऊसपर्यंत नेणाऱ्या महिला पोलिसांसाठीही हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. देशात असहिष्णूतेचे वातावरण असून त्याचा शेवट महिलाच करतील, असं सांगत प्रियांका यांनी राजकारणात आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आवाहन महिलांना केले.
धर्माच्या राजकारणातून आता देशाला बाहेर पडायला हवे. महिला त्यांच्या हिंमतीवर हे करून दाखवतील. आम्ही महिलांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागवले आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मला अधिकार असता तर मी 50 टक्के तिकीटे महिलांना दिली असती, असंही प्रियांका यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सध्या केवळ सात आमदार आहेत. मागील निवडणुकीत भाजपने काँग्रेससह समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीचा सुफडा साफ केला होता. यावेळी भाजपच्या सरकारविरोधात नाराजी असल्याचा दावा या पक्षांनी केला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी जोर लावला आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनेही जय्यत तयारी केली असून मागील काही दिवसांत अनेक विकासकामांना गती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचेही दोन दौरे झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.