शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघ (Mandi Loksabha) आता काँग्रेसने (Congress) भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारास त्याच्याच गावात जास्त मते मिळाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा काँग्रेस ज्येष्ठ नेते कौलसिंह ठाकूर यांनी केली होती. परंतु, प्रत्यक्षात वेळ आली त्यावेळी त्यांनी वेगळेच कारण पुढे केले.
मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह (Pratibha Singh) या विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार व कारगिल युध्दात सहभागी झालेले ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर (Khushal Thakur) यांना पराभूत केले. प्रतिभा सिंह यांनी ठाकूर यांचा 8 हजार 766 मतांनी पराभव केला. हा भाजपसह मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागील निवडणुकीत मंडीतून भाजपचे उमेदवार राम स्वरूप हे तब्बल 3.98 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. स्वरूप यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.
कौलसिंह ठाकूर हे दोन वेळा हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होते. मागील सरकारमध्ये ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. खुशाल ठाकूर यांना त्यांच्याच गावात मताधिक्य मिळाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा कौलसिंह ठाकूर यांनी केली होती. खुशाल ठाकूर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना त्यांच्या गावात 46 मते जास्त मिळाली आहेत. यानंतर प्रसारमाध्यमांनी कौलसिंह ठाकूर यांना राजकीय संन्यासाबाबत विचारणा केली. यावर त्यांनी तो केवळ निवणुकीचा जुमला होता, अशी सारवासारव करीत संन्यास घेण्यास नकार दिला.
मंडी लोकसभा जागेबरोबरच हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. जुब्बल-कोथकाई, फतेहपूर आणि अर्की या तिन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी झालेल्या या पोटनिवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जात होत्या. या निवडणुकांतील पराभवामुळे मुख्यमंत्री ठाकूर यांची मात्र, डोकेदुखी वाढली आहे. भाजपमधील नाराजांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडण्यास सुरवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.