मुंबई : अमली पदार्थ विरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. आता वानखेडे यांच्या मदतीसाठी भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे धावून आले आहेत. त्यांनी वानखेडेंना क्लिनचिट देत त्यांची वकिली केली आहे.
समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोमय्या यांची नुकतीच भेट घेतली होती. याबाबत आज बोलताना सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर पडत आहेत. वानखेडे यांच्याबाबत काहीही निघालेले नाही. नवाब मलिक हे माध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम करीत आहेत. हे माफिया सरकार असून, त्यांनी आता माफियागिरी थांबवयला हवी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तींयावर मागील 19 दिवसांपासून प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाचे छापे सुरू आहेत. या प्रकरणी हजारो कोटींची मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे, अशी सोमय्यां यांनी दिली होती. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नसल्याचे अजित पवार यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, आता अजित पवार म्हणतात माझी मालमत्ता जप्त झालेली नाही. त्यांनी लपवा छपवी थांबवावी. अजित पवारांच्या मित्र परिवाराच्या मालमत्ता जप्त होत आहेत. यात आता त्यांच्या नातेवाईकांचेही नावे समोर येत आहेत. पवार परिवाला हिशोब द्यावा लागणार आहे. मला बदनामीच्या खटल्यांची धमकी दिली जात आहे. अशा डझनभर धमक्या आल्या असून, त्यांना मी घाबरत नाही. अनिल परब, प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड यांचे सहाय्यक, संजय राऊत, हसन मुश्रीफ अशा अनेकांच्या बदनामीच्या नोटिसा मला आल्या आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीने अटक केली आहे. यावर सोमय्या म्हणाले की, कालच अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. आम्ही 23 घोटाळे सिद्ध केले असून, त्यातील एक तरी चुकीचा असल्याचे मला सांगा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेहमी बडबड करायचे आणि आता देशमुखांना अटक झाली. परमबीरसिंह आणि अनिल देशमुख यांना ठाकरे सरकारनेच लपवले होते. देशमुख यांच्या जावयावर अटक होण्याची पाळी आली त्यामुळे ते हजर झालेत. उद्धव ठाकरे यांना आता भीती आहे की, परमबीरसिंह आणि अनिल देशमुख हे 100 कोटींचा हिशोब देऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.