नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) काँग्रेसकडून शुक्रवारी भर्ती विधान या नावाने जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एकत्रिपणे याची घोषणा केली. यावेळी बोलताना प्रियांका यांनी उत्तर प्रदेशातील पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतही मोठे संकेत दिले. तसेच निवडणूक लढवण्याबाबतही त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिलेला नाही. (UP Election Update)
प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना पत्रकार परिषदेत पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. भाजपकडून (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) तर समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. पण काँग्रेसकडून (Congress) अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर बोलताना प्रियांका यांनी थेट उत्तर न देता राजकीय उत्तर देऊन सर्वांनाच पेचात टाकले.
प्रश्नाला उत्तर देताना प्रियांका यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसमध्ये तुम्हाला दुसरा कोणत चेहरा दिसत आहे का, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर त्यांना तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असाल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही प्रियांका यांनी माझाच चेहरा सगळीकडे दिसत आहे ना, असं उत्तर दिलं. प्रियांका गांधी यांच्या या गुगलीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतही त्यांनी थेट नकार दिलेला नाही. निवडणूक लढवण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रियांका या निवडणुकीच्या मैदानात उतरून योगींना टक्कर देणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांनी उत्तर प्रदेशचे अनेक दौरे केले आहेत. काँग्रेसने राज्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली आहे.
राज्यात महिलांना 40 टक्के तिकीटे देण्याचा निर्णयही त्यांचाच होता. त्यामुळे या 40 टक्के तिकीटांमध्ये त्यांचंही नाव असू शकते, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढून विरोधकांनाही संदेश जाऊ शकतो, असे तर्क लावले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
काय आहे जाहीरनाम्यात?
- प्राथमिक शाळांमध्ये दीड लाख शिक्षकांची भरती
- डॉक्टरांची रिक्त पदं तातडीनं भरणार
- अंगणवाडी सेविकांची 20 हजार रिक्त पदे भरणार
- परिक्षार्थींना बस आणि रेल्वेचा प्रवास मोफत करणार
- जॉब कॅलेंजर बनवले जाणार. परिक्षा आणि नियुक्तीची तारीख निश्चित केली जाईल.
- सर्व स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ केले जाईल.
- महाविद्यालयातील निवडणुका सुरू करणार
- विद्यार्थी वसतिगृहांमध्ये सुधारणा करणार.
- भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करणार
- स्टार्टअपसाठी पाच हजार कोटी रुपयांचा सीड स्टार्टअप फंड
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.