

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul) विमानतळावर हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे. आता विमानतळावरी अन्नपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. पाण्याची बाटली 3 हजार रुपयांना तर भाताची प्लेट तब्बल साडेसात हजार रुपयांनी विकली जात आहे.
एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. हजारो नागरिकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची सुरक्षा करीत आहेत. विमानतळावरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. यातच खाद्यपदार्थांचे दुर्भिक्ष्य विमानतळावर जाणवू लागले आहे.
काबूल विमानतळावर महागाईचा भडका उडाला आहे. एका पाण्याची बॉटलची किंमत 40 डॉलर म्हणजेच सुमारे 3 हजार रुपयांवर पोचली आहे. भाताच्या एका प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजे सुमारे साडेसात हजार रूपये मोजावे लागत आहे. हे दर सर्व नागरिकांना परवडणारे नसल्याने अनेकांचे खाण्यापिण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. याचबरोबर विमानतळावर खाद्यपदार्थांचे पैसे अफगाणी चलनात नव्हे तर अमेरिकी डॉलरमध्ये द्यावे लागत आहेत. यामुळे नागरिकांना आणखी वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.
अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.