
म Delhi Assembly Elections: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. राजकारणात असं म्हटलं जातं की निवडणुकीत भरघोस मतदान हे सत्ता बदलाचे संकेत देत असतं. परंतु कधीकधी कमी मतदानही सरकार बदलतं. असंच काहीसं चित्रं यंदा देशाची राजधानी दिल्लीत दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीत सत्ता परिवर्तन होताना दिसत आहे, मात्र तरी 8 फेब्रुवारी रोजीच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. विशेषबाब म्हणजे यंदा दिल्लीत मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के मतदान कमी झाले आहे.
दिल्लीत 5 फेब्रवारी रोजी मतदान पार पडताच समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पार्टीचं सरकार सत्तेतून जाणार आणि भाजपच्या(BJP) हाती सत्ता येणार असल्याचं दिसत आहे. तर काही एक्झिट पोलनुसार काँटे की टक्करही दिसून येत आहे. एक्झिट पोलशिवाय दिल्लीत यंदा झालेले मतदानही बरंच काही सांगून जातं.
दिल्ली विधानसभा(Vidhansabha ) निवडणुकीसाठी यंदा 60.44 टक्के मतदान जालं. दिल्लीच्या उत्तर-पूर्व जिल्ह्यात सर्वाधिक 66.25 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी 56.31 टक्के मतदान दक्षिण पूर्व जिल्ह्यात नोंदवलं गेलं. नवी दिल्ली जिल्ह्यात 57.13 टक्के मतदान झाले. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दक्षिण पश्चिम जिल्ह्यात 61.09 टक्के, पूर्वमध्ये 62.40 टक्के, उत्तरेत 59.25 टक्के, उत्तर पश्चिमेत 60.70 टक्के, शाहदरात 63.94 टक्के, दक्षिणेत 58.16 टक्के, मध्यमध्ये 59.09 टक्के आणि पश्चिममध्ये 60.76 टक्के मतदान झालं.
2025च्या विधानसभा निवडणुकीत 2020च्या निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के कमी मतदान झाले. दिल्लीत 2020च्या विधानसभा निवडणुकीसाठी 62.59 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये पुरुषांची भागीदारी 62.66 टक्के आणि महिलांची 62.52 टक्के होती. 2020मध्ये एकूण 14786382 मतदारांपैकी 9255486 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मागील आकडे जर बघितले तर 2025 मध्ये मागील 12 वर्षांत (2013नंतर) सर्वात कमी मतदान झालं
2013नंतरची जर आकडेवारी बघितली तर दर निवडणुकीत घसरणारा मतदानाचा टक्का हा सत्ताधारी पार्टीसाठी धोक्याची घंटा होता. 2013 हे ते वर्ष होतं जेव्हा दिल्लीत आम आदमी पार्टी उदयास आली होती आणि त्यांची पहिली निवडणूक होती. त्यावेळी दिल्लीकरांनी जबरदस्त मतदान केलं होतं आणि मतदानाच्या टक्केवारीत जवळपास 8 टक्के वाढ झाली होती. परिणामी त्यावेळी दिल्लीत सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला दारूण पराभवास सामोरं जावं लागलं. आम आदमी पार्टीने आपल्या पहिल्याच निवडणुकीत 28 जागा जिंकल्या होत्या.
त्यानंतर 2015मधील विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने मतदानास आणखी जोर लावला, ज्यामध्ये आम आदमी पार्टीला(AAP) प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली. तब्बल 67 जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला. तेव्हा 67.13 टक्के मतदान झालं होतं. मात्र त्यानंतर मग 2020 मध्ये मतदानाची टक्केवारी घसरून 62.59 टक्क्यांवर आली. याचा फटका आम आदम पार्टीला बसला, त्यांच्या पाच जागा कमी झाल्या आणि 62 जागांच त्यांना जिंकता आल्या. तर दुसरीकडे भाजपने आपल्या 3 जागा वाढवून एकूण 8 जागांवर विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 2015 आणि 2020मध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.
मागील निवडणुकीचा अभ्यास केला तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेले कमी मतदान हे सत्ताधारी आम आदमी पार्टीला नुकसानदायक ठरू शकते आणि भाजपला मात्र फायदा होईल असे चित्र आहे. दिल्लीत भाजपला होणाऱ्या फायद्यात काँग्रेसचंही योगदान म्हणावं लागेल, कारण काँग्रेस सत्ताधारी आम आदमी पार्टीची मतं कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतान दिसून आला. एकूणच आता या कमी झालेल्या मतदानाचा नेमका कुणाला फायदा होणार हे 8 फेब्रुवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.