Election Results : देशभरात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. नुकत्याच मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांची विधानसभा निवडणूक 7 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पार पडली, तर आज तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या पाचही राज्यांमधील निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची रंगीततालीम म्हणून बघितलं जात आहे. त्यामुळे निकालाची राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेलाही तितकीच उत्सुकता आहे.
अशावेळी निकालाअगोदर विविध माध्यम आणि यंत्रणांकडून निकालाबाबत एक्झिट पोल जारी केले जातात आणि यावरून निकाल नेमका कसा असेल याचा अंदाज वर्तवला जातो. निवडणूक कालावधीत दोन्ही गोष्टी सातत्याने आपण ऐकतो, त्या म्हणजे 'एक्झिट पोल' आणि 'ओपिनियन पोल' मात्र आजही बहुतांश जणांमध्ये या दोन्हींबाबत संभ्रम दिसतो. याच पार्श्वभूमीवर आपण या निकालाच्या निमित्ताने 'एक्झिट पोल' आणि 'ओपिनियन पोल' मधील फरक जाणून घेऊयात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'एक्झिट पोल' आणि 'ओपिनियन पोल'मधील प्रमुख फरक म्हणजे, ओपिनियन पोल हा मतदानाच्या अगोदर घेतला जातो, तर एक्झिट पोल हा मतदारांकडून मतदान झाल्यानंतर जाहीर केला जातो. आपण या दोन्हींना निवडणुकीबाबतचा एक ढोबळ अंदाज म्हणू शकतो.
खरंतर एक्झिट पोल हा एक प्रकारचा निवडणूक सर्व्हे असतो. मतदानाच्या दिवशी जेव्हा मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडतो, तेव्हा तिथे विविध सर्व्हे एजन्सी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतात. ते मतदाराला मतदानाबाबत प्रश्न विचारतात, जसे की मत कुणाला दिलं? किती मतदान होईल? तुमचा अंदाज काय इत्यादी.
अशाप्रकारे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांवर केवळ मतदारांचा कल जाणून घेतला जातो. यामधून मतदानाच्या दिवशी दिवसभरात मोठ्या प्रमाणात माहिती आणि आकडेवारी जमा होते. यानंतर या सर्व माहितीच्या आधारे निकालाबाबत अंदाज जाहीर केला जातो. ज्यामध्ये कोणता पक्ष किती जागा जिंकेल, ही आकडेवारी मतदान संपल्यानंतरच दर्शवली जाते.
ओपिनियन पोल हा मतदानाच्या अगोदर केला जातो. ओपिनियन पोलमध्ये सर्व लोकांना सहभागी करून घेतले जाते, मग त्यामध्ये मत मांडणारी व्यक्ती भलेही मतदार असो किंवा नसो, त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं. यामध्ये मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मत, विद्यमान सरकारवर समाधानी आहेत किंवा नाही, नागरिकांना काय अपेक्षित होतं आणि आहे, नागरिकांची नाराजी इत्यादीबाबत माहिती गोळा केली जाते आणि त्यानंतर मतदानाबाबत अंदाज वर्तवला जातो.
जगात निवडणूक सर्वेक्षणाची सुरुवात सर्वात अगोदर अमेरिकेत झाली. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रोबिन्सन यांन अमेरिकी सरकारच्या कामकाजाबाबत लोकांचे मत जाणण्यासाठी, सर्व्हे केला होता. यानंतर ब्रिटनने 1937 आणि फ्रान्सने 1938 आपल्या इथे मोठ्या प्रमाणात ओपिनियन पोल सर्व्हे केले. पुढे जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम आणि आयर्लंडमध्ये निवडणूकपूर्व सर्व्हे केले गेले.
'एक्झिट पोल'ची सरुवात नेदरलॅण्डमधील समाज अभ्यासक आणि माजी नेते मार्सेल वॉन डॅम यांनी केली होती. वॉन डॅम यांनी पहिल्यांदा १५ फेब्रुवारी १९६७ याचा वापर केला होता. त्यावेळी नेदरलॅण्डमध्ये झालेल्या निवडणुकीबाबत त्यांचा अंदाज अगदी योग्य ठरला होता. भारतात एक्झिट पोलची सुरुवात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक (आयआयपीयू)चे प्रमुख एरिक डी कोस्टा यांनी केली होती.
१९९६मध्ये एक्झिट पोल सर्वाधिक चर्चेत आले होते. त्यावेळी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी(सीएसडीएस)ला देशभरात एक्झिट पोल करण्याची परवानगी दिली गेली होती. यानंतर १९९८मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर एक्झिट पोलचे प्रसारण केले गेले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.