

Karnataka CM change speculation : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदावरून घमासान सुरू आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघे आता एकमेकांना थेट भिडले आहेत. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर ते ‘एकनाथ शिंदे’ होतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसचे संकटमोचक डीकेंनी थेट मुंबई गाठली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सिध्दरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावर अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकार स्थापनेवेळी अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरला होता, असा दावा शिवकुमार यांच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक आमदार मुख्यमंत्री बदलाची जोरदार मागणी करत आहेत. त्यातच शिवकुमार यांनी गुरूवारी सोशल मीडियात एक पोस्ट केली अन् सत्तासंघर्षावर शिक्कामोर्तब झाले.
शिवकुमार यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘वचनाची ताकद म्हणजे जगाची ताकद आहे.’ यानंतर काही तासांतच सिध्दरामय्यांनीही पोस्ट करत त्याला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. ‘वचन तेव्हाच ताकद बनते, जेव्हा ते लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणेल,’ असं सांगत त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांची यादीच टाकली. दोघांमधील या संघर्षामुळे काँग्रेसचे नेतृत्व चांगलेच कोंडीत अडकले आहे.
शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल. शिवकुमार अनेक आमदारांसह भाजपला जाऊन मिळतील आणि मुख्यमंत्री बनतील, अशा चर्चा राज्यात सुरू आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपद मिळवले होते. कर्नाटकातही तशीच चर्चा सुरू आहे. त्यातच शिवकुमार मुंबईत गुरूवारी रात्री दाखल झाले.
मुंबईत भेटीविषयी बोलताना शिवकुमार यांनी हा दौरा खासगी असल्याचे सांगितले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंबईत आल्याचे ते म्हणाले. बैठकाच करायच्या असत्या तर बेंगलुरू किंवा दिल्लीत असत्या, असेही ते मीडियाशी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी आपल्याला कोणतीही घाई नसल्याचे सांगितले.
दरम्यान, कर्नाटकातील सत्तासंघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलविण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या दोघांशी चर्चा करून तोडगा काढतील. मात्र, राहुल गांधी अद्यापही सिध्दरामय्या यांच्याबाबत सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कर्नाटकातील वाद आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.