
Narendra Modi US Relations : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकेकाळी चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात होत होती. मात्र, अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी भारताविरोधात अनेक टोकाचे निर्णय घेतलेत.
नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली तर येत्या 27 तारखेपासून अतिरिक्त टॅरिफ लागू देखील केला जाणार आहे. ट्रम्प यांचं भारतविरोधी धोरण, चीनला दिली जाणारी सवलत आणि पाकिस्तानसोबतची जवळीक या सर्व बाबींवर आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे माजी सल्लागार आणि ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांनी भाष्य केलं आहे.
ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर लादलेल्या मनमानी टॅरिफचे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून ही परिस्थिती बिघडण्याची फक्त सुरुवात आहे. ट्रम्प यांची व्यापार धोरणं, भारतापासून दूर जाणं आणि पाकिस्तानशी जवळीक साधणं यामुळे आर्थिक आणि भू-राजकीय अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा स्टीव्ह हँके यांनी दिला आहे.
हँके यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुटप्पी वागण्यावरूनही सडकून टीका केली. ते म्हणाले, "ट्रम्प असा माणूस आहे जो सकाळी मोदींशी हात मिळवू शकतो आणि रात्री त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसू शकतो." शिवाय भारत कायमस्वरूपी अमेरिकेच्या मैत्रीवर अवलंबून राहू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञांनीच आरसा दाखवल्याचं पाहायला मिळत आहे.
तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला टॅरिफची धमकी देत पुन्हा आपला निर्णय मागे घेतला. त्याचं कारण म्हणजे, व्हाईट हाऊस मान्य करतं त्यापेक्षा चीनकडे खूप जास्तीची ताकद आहे. चीनने खनिज संपत्ती, धातुकर्म आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रांमध्ये वर्चस्व मिळवलं आहे. यामुळेच ट्रम्प यांना चीनबाबतच्या निर्णयांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडल्याचं हँके म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानची अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतानाही ट्रम्प भारताकडून पाकिस्तानकडे का झुकलेत? असा सवाल करत हँके यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, "यामागे अर्थशास्त्र नव्हे तर भू-राजकारणात आहे. अमेरिका अजूनही इराणच्या शेजारील हवाई तळांवर प्रवेश मिळवण्यासाठी पाककडे मदत मागत आहे. मागील महिन्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख दोनदा अमेरिकेत आले. ते इराणवर आणखी एका हल्ल्यासाठी किंवा संभाव्य हल्ल्यासाठी तयारी करत आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.