
Impact on Musk–Trump Relationship : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्यातील वाद टोकाला पोहचला होता. मस्क यांनी तर जणू ट्रम्प यांच्याविरोधात थेट मोहिमच उघडली होती. आपल्या मालकीच्या ‘एक्स’वरून त्यांनी काही जिव्हारी लागणाऱ्या पोस्ट करत ट्रम्प यांना टार्गेट केले होते. पण काही दिवसांतच त्यांना उपरती झाली आहे.
मस्क यांनी बुधवारी एक्सवर दोन वाक्यांतच ट्रम्प यांच्यासोबत सुरू असलेला वाद सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पश्चातापाची भूमिका घेत आपण एवढे बोलायला नको होते, असा यू टर्न घेतला आहे. त्यामुळे मस्क यांच्या या भूमिकेमुळेही आता चर्चांना उधाण आले आहे.
मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मागील आठवड्यातील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीच्या माझ्या पोस्टचा मला पश्चाताप होत आहे. मी जास्तच बोललो, असे मस्क यांनी लिहिलं आहे. मस्क यांनी अचानक आपली भूमिका बदलण्यामागे नेमके काय कारण, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेच मस्क यांच्यावर सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी सोपवली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी मागील आठवड्यात हे पद सोडले. तेव्हापासून दोघांमध्ये तू तू मैं मैं सुरू आहे. मस्क यांनी नवीन ट्रक्स बिलावरून टीका केली होती. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांविरोधात त्यांनी उघडपणे एकप्रकारे बंड करण्याचे आवाहन केले होते.
यादरम्यान ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना मस्क यांना याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराच दिला होता. वाद मिटवण्याचा यामागे कोणताही हेतू नसल्याचेही ते म्हणाले होते. पण त्यानंतर मस्क यांनी एक धक्कादायक पोस्ट करत ट्रम्प यांनी डिवचले होते. एपस्टीन लिस्टमध्ये ट्रम्प यांचे नाव असल्याची पोस्ट मस्क यांनी केली होती. त्यामुळे सरकार याबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
मस्क यांच्या दोन्ही पोस्टवरून चर्चांना उधाण आल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी या पोस्ट डिलिट केल्या. पण त्यामागे कोणतेही कारण त्यांनी सांगितले नाही. ट्रम्प यांनी एपस्टिन लिस्टबाबतचे मस्क यांचे दावेही एका मुलाखतीत फेटाळून लावले होते. दुसरीकडे ट्रम्प यांच्याकडून मस्क यांच्या काही प्रकरणांची चौकशी करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही लगेचच मस्क यांनी माघार घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.