मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर महिनाभरातच येडियुरप्पा कुटुंबीयांसह देशाबाहेर!

दक्षिणेत भाजपचा मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावणारे येडियुरप्पा हे आता कुटुंबीयांसमवेत वेळ घालवू लागले आहेत.तब्बल 10 वर्षांनी ते सगळ्या कुटुंबीयांसह विदेशात गेले आहेत.
former karnataka chief minister b s yediyurappa goes to maldives
former karnataka chief minister b s yediyurappa goes to maldives
Published on: 
Updated on: 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. दक्षिणेत भाजपचा मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावणारे येडियुरप्पा हे आता कुटुंबीयांसमवेत वेळ घालवू लागले आहेत. तब्बल 10 वर्षांनी ते सगळ्या कुटुंबीयांसह विदेशात गेले आहेत. 

येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महिनाभरातच ते विदेशात गेले आहेत. येडियुरप्पांना खासदार बी.वाय.राघवेंद्र आणि भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. मुले आणि मुलींच्या कुटुंबांसमवेत येडियुरप्पा 18 ऑगस्टला मालदीवला रवाना झाले. मागील 10 वर्षांत प्रथमच येडियुरप्पा हे कुटुंबीयांना घेऊन विदेशात फिरायला गेले आहेत. ते लवकरचे देशात परतणार आहेत, अशी माहिती येडियुरप्पांच्या निकटवर्तीय भाजप नेत्याने दिली. 

दरम्यान, येडियुरप्पा, त्यांचे पुत्र विजयेंद्र, नातू शशिधर मराडी, जावई विरुपाक्षप्पा यमकानम-अराडी, नातीचे पती संजय श्री हे भ्रष्टाचार प्रकरणात आरोपी आहेत. गृहनिर्माण प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना लोकायुक्त न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली होती. त्यावेळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास मंजुरी नसल्याचे कारण लोकायुक्त न्यायालयाने दिले होते. या विरोधात याचिकाकर्ते व सामाजिक कार्यकर्ते टी.जे.अब्राहम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी येडियुरप्पांसह इतरांना आज न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. 

येडियुरप्पा आणि सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी न मिळाल्याने विशेष न्यायालयाने हे प्रकरण फेटाळले होते. त्यावेळी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि मंत्री होते. बंगळूर विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कंत्राटदाराकडून लाच घेतल्यासंबंधीचा हा खटला आहे. येडियुरप्पांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर करुन कंत्राटे दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. कर्नाटक विधानसभेत या विषयावर चर्चाही झाली होती. तेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि गंभीर आरोप केले होते. येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाने या प्रकरणामध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com