BJP News : मध्य प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची ‘लाडली बहना’ ही योजना राज्यात भलतीच लोकप्रिय ठरली. ही योजनाच भाजपच्या विजयात मैलाचा दगड ठरल्याचे मानले जात आहे. राज्यातील महिलांमध्ये चौहान यांनी बहिण-भावाचे नाते निर्माण ‘मामा’ म्हणून ओळख निर्माण केली. आता मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यानंतर या बहिणी चांगल्याच भावूक झाल्या आहेत. सोमवारी चौहान यांच्या निरोपाच्या पत्रकार परिषदेपुर्वी काही महिला चौहान यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या.
मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे सरकार आता पायउतार झाले आहे. नवे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांचा बुधवारी शपथविधी होणार आहे. यापार्श्वभूमीवर चौहान यांचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दोन महिला त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत आहेत. आम्ही तुम्हाला मत दिले होते, कुठेही जाऊ देणार नाही, असे या महिला म्हणत आहे. त्यांची समजूत काढताना चौहानही भावूक झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
लाडली बहना योजनेमध्ये महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १२५० रुपये जमा केले जातात. ही रक्कम वाढविण्याचे आश्वासन चौहान यांनी प्रचारादरम्यान दिले होते. निवडणुकीच्या निकालाआधी चौहान यांनी लाडली बहनान विजयातील सर्व अडसर दूर केल्याचे वक्तव्य केले होते. मंगळवारी चौहान यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या साडेसोळा वर्षाच्या कारकीर्दीतील कामांचा लेखाजोखा मांडला. त्याआधी काही महिलांनी त्यांची भेट घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भेटीदरम्यान, काही महिलांना अश्रू अनावर झाले. भैया, आम्ही तुम्हाला मत दिल आहे. तुम्ही बहिणींचे लाडके आहात. तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, अशा भावना या महिला व्यक्त करत होत्या. या महिलांना सावरताना शिवराज सिंहही भावूक झाले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत मी कुठेही जात नाही, असे ते समजावून सांगत होते.
दरम्यान, मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून सुरूवातीला शिवराज सिंह यांना डावलण्यात आले होते. पण प्रचारात मागे पडत असल्याचे दिसू लागल्यानंतर त्यांना प्रचारात पुढे करण्यात आले. असे असले तरी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरवशावरच लढण्यात आली होती. भाजपकडून शेवटपर्यंत मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हे गुलदस्त्यात ठेवले होते.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.