

Goa Nightlife Black Market Exposed : गोवा (हडफडे) येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत सिंधुदुर्गातील एकासह २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोव्यातील ‘नाईट लाईफ’मधील ‘काळा’ बाजार चर्चेत आला. अर्थात, यातील विकृत चेहरा अद्याप पुरेसा उजेडात आला नसला तरी कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल होतेच. मात्र, त्याच्या जोडीने फोफावणारी विकृती आता गोव्यालाही डोईजड झाली आहे.
गोव्यात याचे लोण वेगाने पसरले असून देशभरातील अतिश्रीमंत ग्राहकवर्ग यातून तयार झाला. यामुळे ‘देशी ग्राहकांसाठी, परदेशी ललनांचे ठुमके’ असे वेगळेच पर्यटनसूत्र गोव्याच्या ‘नाईट लाईफ’मध्ये घट्ट झाले आहे. सिंधुदुर्गात अलीकडे घुसलेल्या दिल्ली लॉबीशी या ‘नाईट लाईफ’चे थेट कनेक्शन आहे. त्यामुळे भाविष्यात हे सगळे प्रकार वेस ओलांडून लगतच्या सिंधुदुर्गात येण्याला फारसा वेळ लागणार नाही. याच विकृत ‘नाईट लाईफ’चा बुरखा फाडण्याचा हा प्रयत्न...
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबमध्ये शोले चित्रपटातील ‘मेहबुबा मेहबुबा’ हे गाणे वाजत होते. डोळे दीपवणारे प्रकाशझोत सगळीकडे फेकले जात होते. डान्स फ्लोअरवर रशियन बेली डान्सर या गाण्यावर बेधुंद नाचत होती आणि अचानक तिच्या अजूबाजूच्या छतावर आगीच्या अक्राळ विक्राळ ज्वाळांचा भडका उडाला.
काही क्षणात या आगीने अख्ख्या नाईट क्लबचा ताबा घेतला. यात जळून, गुदमरून २५ जणांचा मृत्यू झाला. पाच पर्यटक आणि २० कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. सिंधुदुर्गातील देवसूमधील एक तरुण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. या घटनेच्या निमित्ताने गोव्यातील ‘नाईट लाईफ’ पूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला.
अर्थात, या विकृत ‘नाईट लाईफ’ची झळ भविष्यात गोव्यालगतच्या आपल्या सिंधुदुर्गाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक अख्खे राज्य असलेल्या आणि तितकीच प्रभावी यंत्रणा असलेल्या गोव्याला हे सगळे प्रकार आता डोईजड होत आहेत, मग सिंधुदुर्गात असलेल्या तुटपुंज्या यंत्रणेला अशा गोष्टींचा सामना करावा लागला तर काय होईल? याची कल्पनाच न केलेली बरी. ही शक्यता वर्तवण्याचे कारण म्हणजे केवळ गोव्याचा शेजार हेच नव्हे तर, ‘नाईट लाईफ’शी असलेले आणि आता सिंधुदुर्गाशी नव्याने जोडलेल्या दिल्ली लॉबीचेही कनेक्शन आहे.
महाराष्ट्रातील मुंबईसह पनवेलमध्ये साधारण २० वर्षांपूर्वी डान्सबार जोरात होते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे डान्सबार बंद करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली. याच्या हालचाली २००५ पासून सुरू झाल्या. प्रकरण न्यायालयात गेले. यानंतर आलेले वेगवेगळे निर्णय, महाराष्ट्र सरकारची भूमिका यामुळे महाराष्ट्रात डान्सबारचे भवितव्य दोलायमान असल्याचे हे बार चालवणाऱ्या लॉबीच्या लक्षात आले. त्यांनी आपला मोर्चा पर्यटनाचे नंदनवन असलेल्या गोव्याकडे वळवला. किनारी भागात २०११ पासून अल्प प्रमाणात हे डान्सबार सुरू झाले. यासाठी मुंबईतून बारबाला आणल्या जायच्या. पार्ट्या आयोजित करून यात बारबाला नाचायच्या.
डान्सबार ही संकल्पना साधारण वर्षभरात म्हणजे २०१२ पासून वेगाने फोफावू लागली. उत्तर गोव्यातील सिकेरी ते बागा या किनारपट्टी भागात त्यांनी बस्तान बसवायला सुरुवात केली. याचवेळी पर्यटन आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, उलाढाल यावर गोवा सरकारही वेगवेगळ्या पातळीवर काम करत होते. सुरुवातीला हे अनधिकृत ‘नाईट लाईफ’ चालवण्यासाठी स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी यंत्रणांना हाताशी धरले जात असे. पुढे याची व्याप्ती वाढत गेली. या भ्रष्टाचारात यंत्रणेतील वरच्या स्तरामधील लोकही सामील झाले. यातून अनधिकृत असलेल्या या धंद्याला राजमान्यता मिळाली. एका अनधिकृत आकडेवारीनुसार, गोव्यात सध्या तब्बल ११५ डान्सबार किंवा नाईट क्लब आहेत. यातील तब्बल ७९ क्लबकडे परवाना नाही. इतक्या छोट्या राज्यात अशा पद्धतीने धंदा चालत असेल तर त्यामागे किती भ्रष्टाचार असेल, याची कल्पनाच नको.
अवैध नाईट क्लब चालवण्यासाठी काय प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल? अर्थात सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी यंत्रणांचे हात ओले केले जात असत. यात तेथील पोलिस, पालिका, पंचायत, अबकारी विभाग, कर बसवणारी यंत्रणा यांचा समावेश होता. या स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेच्याही पलीकडे भ्रष्टाचारात अडकवून सुरू झालेला हा प्रवास अगदी कमी काळात वरिष्ठ यंत्रणेपर्यंत पोहोचला. यातून हे ‘नाईट लाईफ’ अधिकृत असल्यासारखे गोव्यातील पर्यटनाचा भाग बनून गेले. यातून करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल सुरू झाली. अनधिकृत असल्याने कर भरण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे यंत्रणेला हाताशी धरले की सगळे सुरळीत होऊ लागले. आताही हे क्लब असलेल्या परिसरातील थेट अंमलबजावणी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता तपासल्या तर काय प्रकारची ‘वर कमाई’ झाली, याचा अंदाज येऊ शकेल.
डान्सबार ते नाईट क्लब हा बदलही वेगाने झाला. सर्वसाधारणपणे डान्सबारमध्ये पैसे नर्तकीवर उडवले जातात. गोव्यातल्या या नाईट क्लबमध्ये सर्रास परदेशी नर्तकी असतात. त्यांचा नृत्याचा दर ठरलेला असतो. अशा ठिकाणी प्रामुख्याने पंजाब, दिल्ली येथील अतिश्रीमंत तसेच महाराष्ट्रातील बडे धनिक हे ग्राहक असतात. तितके पैसे देण्याची क्षमता असलेल्यांसाठी मग तो शो सुरू होतो. बेधुंद करणाऱ्या संगीताच्या आणि डोळे दीपवणाऱ्या प्रकाशझोतामध्ये सुरू झालेले नृत्य हळूहळू बिभत्स अश्लीलतेकडे जाते. यात दारू, अमली पदार्थ यांचे सेवन सर्रास होते. अशा गोष्टीतून होणारी आर्थिक उलाढाल करोडो रुपयांमध्ये असते. केवळ त्या क्लबला ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपुरती ती मर्यादित नसते तर, यातून अमली पदार्थ, महागडी दारू, गाड्या, राहण्यासाठी व्हिला भाड्याने देण्याचे एक चक्रच तयार होते. यात कुठलाही कर नसतो. कारण हा धंदाच अनधिकृत असतो. गोव्यात याचे लोण वेगाने पसरले आणि देशभरातील अतिश्रीमंत ग्राहकवर्ग यातून तयार झाला. यामुळे ग्राहक देशी आणि ललना परदेशी असे वेगळेच पर्यटनसूत्र गोव्याच्या ‘नाईट लाईफ’मध्ये घुसले.
मुंबईतून आलेल्या बारबालांचा जमाना फारसा टिकला नाही. त्याची जागा परदेशातून येणाऱ्या बेली डान्सरनी घेतली. रशियाच्या विभाजनानंतर तेथील काही प्रांतांमध्ये अचानक गरिबी सतावू लागली. पर्यटनाच्या माध्यमातून रशिया आणि गोवा यांचे संबंध पूर्वीपासून आहेत. त्यामुळे तेथील युक्रेन, उज्बेकिस्तान या गरीब प्रांतांतील मुली पोट भरण्यासाठी गोव्याकडे येऊ लागल्या. या डान्सबारमध्ये त्यांचा प्रवेश झाला. यामुळे मुंबईच्या बारबाला यातून बाहेर फेकल्या गेल्या. गोव्यात या धंद्याने डान्सबार ते नाईट क्लब अशा केलेल्या प्रवासात हा एक मोठा बदल होता. यातून या नाईट क्लबमध्ये येणारा ग्राहकही बदलला. अधिक पैसे खर्च करू शकणारे अतिश्रीमंत याचे मुख्य ग्राहक बनले. या बदलानंतर हा अनधिकृत धंदा जास्त फोफावला.
गोव्यात आधीपासूनच मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी दिल्ली लॉबी सक्रिय होती. गोव्यात बहुसंख्य वरिष्ठ अधिकारी दिल्लीतून येतात. त्यात त्यांच्यातील काही भ्रष्ट प्रवृत्तींच्या माध्यमातून ही लॉबी सक्रिय झाली होती. याच दरम्यान मुंबईतील बार चालकांनी गोव्यात नाईट लाईफची आणलेली संकल्पना या लॉबीच्या नजरेत आली. अनधिकृत असल्याने कर भरायचा प्रश्न नव्हता. शिवाय उच्चभ्रू ग्राहक असल्याने अल्प कालावधीत दामदुपटीपेक्षा जास्त फायदा मिळत होता. हेच ओळखून दिल्ली लॉबीने यात जोरदार मुसंडी मारली. उत्तर गोव्यातील तुलनेत नजरेत नसलेल्या किनारपट्टी भागात घर नंबर असलेल्या मालमत्ता घ्यायला सुरुवात केली. अशा ठिकाणी कायदेशीर पळवाटा काढून नाईट क्लबसाठी आवश्यक गोष्टींची जुळणी केली. यात वीज, लाकडाचा वापर करून नाईट क्लबसाठीची जागा, किचन, इतर आवश्यक इमारती उभारल्या गेल्या. हळूहळू हा पूर्ण अनधिकृत धंदा दिल्ली लॉबीच्या प्रभावाखाली आला.
एखादा नाईट क्लब चालवण्यासाठी मोठी यंत्रणा लागते. यात चिकन, भाज्या, दारू पुरवणारे, किचन सांभाळणारे कूक, नोकर आदींचा समावेश असतो. यात प्रामुख्याने नेपाळ, झारखंड, ओरिसा येथील कामगारांचा उपयोग केला जातो. या अनधिकृत उलाढालीतून स्थानिकांच्या हाती फारसे काही लागत नाही. गोव्यातील अनेकांनी पैशांच्या आमिषापोटी विकलेल्या जागांवर हे धंदे फोफावले आहेत. यातील पैसे दिसू लागल्यानंतर आता गोव्यातील लोक भाडेपट्टीवर किंवा ‘प्रॉफिट शेअर’ तत्त्वावर आपल्या जागा देऊ लागले आहेत; मात्र मुळात हा धंदा अनधिकृत असल्याने स्थानिक लोकांना यातून मिळणारा आर्थिक फायदा खूपच मर्यादित आहे.
गोव्यात उपद्रवी ठरलेली दिल्ली लॉबी आता सिंधुदुर्गातही घुसली आहे. पूर्वी गोव्यात परदेशी पर्यटक अमली पदार्थांच्या सेवनासाठी पार्ट्या करायचे. या अनधिकृत रेव्ह पार्ट्या किनाऱ्यावर होत असत. आता हे प्रकार गोव्याच्या पलीकडे कर्नाटकातील गोकर्ण भागात चालतात. गोव्यात मात्र नाईट क्लब फोफावले आहेत. सिंधुदुर्गापासून याचे अंतर खूप कमी आहे. जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये या दिल्ली लॉबींनी जमिनी खरेदी केल्या आहेत. गोव्यासारखे अनधिकृत प्रकार भविष्यात येथे होऊ लागले, तर त्यांना नियंत्रित करणारी यंत्रणा आपल्याकडे फारच दुबळी आहे. हे प्रकार गोव्याच्या संस्कृतीसाठीही डोकेदुखी बनली आहे, मग सिंधुदुर्गात याच्या झळा बसल्या तर काय परिस्थिती ओढवेल, याची कल्पनाही न केलेली बरी.
गोव्यात अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यात पोलिस अधीक्षक, अग्निशमन दलाच्या संचालकांचा समावेश आहे. याचा अहवाल आठवड्याभरात मिळेल. याशिवाय महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून राज्यातील सर्व क्लबचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिटनंतर क्लबबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करून त्यावर आधारित याची कार्यपद्धती राहील.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
- आग लागली तो नाईट क्लब पाडण्याचा आदेश दिला होता; मात्र सरकारच्या पंचायत संचालनालयाने त्याला स्थगिती दिली होती. पंचायत मंडळाच्या ठरावानंतरच व्यापार परवाने दिले जातात. मंडळाच्या निर्णयाशिवाय कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. याच गावातील पाच डान्सबार मीच बंद केले आहेत. ते पुन्हा सुरू करण्यासाठी मला लाखो रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र मी ती स्वीकारली नाही.
- रोशन रेडकर, सरपंच, हडफडे
- नाईट क्लब दुर्घटना ही केवळ अपघात नसून सत्ता, पैसा आणि बेकायदेशीर पर्यटन उद्योग यातील संगनमताचा भीषण परिणाम आहे. भ्रष्ट परवाना पद्धती ढासळलेली तपासणी व्यवस्था आणि राजकीय संरक्षणाची थेट देणगी म्हणून याकडे पाहावे लागेल. पर्यटनाच्या नावाखाली चालणारे अतिक्रमण, ड्रग्ज-फेस्ट संस्कृती आणि नाईट क्लब माफियांच्या बेकायदेशीर साम्राज्याला सरकारकडून मिळणारा मूक आधार या घटनेमुळे जीवघेणा ठरत असल्याचे पुढे आले आहे.
- नितीन फळदेसाई, बजरंग दल, गोवा प्रमुख
- स्थानिकांच्या हातून गोवा सुटत चालला आहे. दिल्ली लॉबीने गोव्याचे राजकारणच नव्हे तर अर्थकारणावर ताबा मिळवला आहे. न्यायालय, कायदा यांना न जुमानता सर्रास अवैधपणे क्लब चालवले जात आहेत. हडफडे येथे घडलेला प्रकार म्हणजे दुर्घटना नसून या सगळ्या व्यवस्थेने केलेली हत्याच आहे.
- डॉ. ऑक्सर रिबिलो, सामाजिक कार्यकर्ते, गोवा
आपल्या जमिनी कोणाला विकू नका असे सांगण्याचा अधिकार नाही; मात्र जमिनी जपून ठेवण्याचा सल्ला जरूर देता येतो. अनेक राज्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना जमिनी विकणे कायद्याने प्रतिबंधित आहे. अशा पद्धतीचे कायदे झाले तर संस्कृती आणि परंपरा जपता येईल. पैसा महत्त्वाचा असला तरी त्याचा अतिरेक अनर्थ घडवतो.
- गजानन तिळवे, सामाजिक कार्यकर्ते, गोवा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.