New Delhi : स्वातंत्र्यदिनी देशभरात उत्साह असताना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातील एका गोष्टीमुळे वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बसण्याची जागा चुकल्याचे काँग्रेसकडून निदर्शनास आणून देताना थेट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे गुरूवारी ते लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मागील दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. कारण 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नव्हते.
कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांना मागून दुसऱ्या रांगेत बसवण्यात आले होते. त्यांच्या आजुबाजूला ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू होते. मागील रांगेतही काहीजण उपस्थित होते. पहिल्या रांगेत सरन्यायाधीशांसह लोकसभा अध्यक्ष व काही केंद्रीय मंत्री बसले होते.
प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेत्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले जाते. ही जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची असते. यावरूनच काँग्रेसने राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा म्हणाले, संरक्षण मंत्रालय एवढे वाईट का वागत आहे. राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांपेक्षा मोठे असतात. लोकसभेत पंतप्रधानांनंतर हे पद आहे. राजनाथजी, तुम्ही संरक्षण मंत्रालायला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकीयकरण करण्याची परवानगी कशी देऊ शकता. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी टीका तन्खा यांनी केली आहे.
दरम्यान, राहुल यांच्या बसण्याच्या जागेवरून वाद सुरू असताना संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी यावेळी सुरूवातीच्या रांगा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधींना मागील रांगेत बसावे लागले, काही केंद्रीय मंत्र्यांनाही मागील रांगेत बसावे लागले, असे मंत्रालयातील सुत्रांनी सांगितल्याचे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.