Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला मतदारांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसते. बंपर मतदानामुळे भाजपच्या सत्तेत जाण्याचा आशा बळावल्या आहेत. या टप्प्यांतील राज्यांतील 15 जिल्ह्यातील 43 जागांसाठी मतदान झाले.
झारखंडमध्ये सत्ताधारी इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये थेट लढत होत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन सत्ता शाबूत ठेवणार की भाजप पुन्हा सत्ता काबीज करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला मिळालेला प्रतिसाद पाहता दोन्ही आघाड्यांकडून मतदारांनी आपल्याच कौल दिल्याचा दावा केला जात आहे.
मागील निवडणुकीत राज्यात एकूण मतदान 63.9 टक्के मतदान झाले होते. यावेळी पहिल्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत जवळपास 65 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीमध्ये हा टक्का वाढू शकतो. वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर ठरणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. वाढीव मतदान हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असते, असे मानले जाते. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होऊनही सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीही आशावादी आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे याचदिवशी प्रत्यक्ष मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपले मत टाकले, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, झारखंडसह आज इतर काही राज्यांमध्येही विधानसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघात प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात निवडणूक होत आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यांतही पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीही बुधवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालाकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.