Karnataka BJP News: भाजपला कर्नाटकात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे माजी आमदार एन. एल. नरेंद्र बाबू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी नरेंद्र बाबू यांचा पक्षप्रवेश झाला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी नरेंद्र बाबू यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी कर्नाटक भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा सोपवला. भाजप सोडल्यानंतर आपण काँग्रेसमध्ये परतणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाकडे आधीपासूनच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
कर्नाटकात भाजपमधील काही नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असतानाच नरेंद्र बाबू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. आगामी काळात भाजपमधून आणखी काही नेते काँग्रेसमध्ये दाखल होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
नरेंद्र बाबू यांच्या पक्षप्रवेशानंतर डी. के. शिवकुमार यांनी भाजपवर निशाणा साधत मोठा दावा केला. नरेंद्र बाबू यांच्याशिवाय भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये केंद्रीय पातळीवरील काही नेत्यांचाही समावेश असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हास्तरावरील पक्ष नेत्यांवर सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या विचारसरणीवर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर विश्वास असणाऱ्यांना सोबत घेण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे शिवकुमार म्हणाले.
शिवकुमार यांनी तरुणांचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. देशाला प्राधान्य देणारी तरुण पिढी आता काँग्रेसकडे आशेने पाहत असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या १३ वर्षांत भाजपला संधी देण्यात आली, मात्र आता तरुणांना काँग्रेसकडून अपेक्षा असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजपचा राजीनामा देताना नरेंद्र बाबू यांनी पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. पक्षासाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपेक्षित ओळख आणि पद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आपण काँग्रेससोबत काम करणार असल्याचे नरेंद्र बाबू यांनी स्पष्ट केले. भाजपचा राजीनामा, ओबीसी मोर्चाचे अध्यक्षपद सोडणे आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, या घडामोडीमुळे कर्नाटकातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.