
थोडक्यात महत्वाचे :
म्हैसूर दसरा महोत्सवाचे उद्घाटन बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते होणार असून त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
उद्घाटन हिंदू परंपरेनुसार केवळ हिंदू व्यक्तीनेच करावे, अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळली आहे.
सरकारने दसरा हा सांस्कृतिक महोत्सव असल्याचे सांगितले असून आता 22 सप्टेंबरला बानू मुश्ताक उद्घाटन करतील, हे निश्चित झाले आहे.
Why Banu Mushtaq Was Chosen to Inaugurate Mysuru Dasara : म्हैसूरमधील ऐतिहासिक दसरा महोत्सव यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. एका मुस्लिम महिलेच्या हातून महोत्सवाचे उद्घाटन नको, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली.
कर्नाटक हायकोर्टाने आज याबाबतचा निकाल दिला आहे. त्यामुळे बानू मुश्ताक यांच्या हस्तेच ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे उद्घाटन करण्याचा मार्ग मोकळ झाला आहे. कोणत्याही अन्य धर्मातील व्यक्तीला उद्घाटनासाठी आमंत्रित केल्यामुळे याचिकाकर्त्यांच्या संविधानिक किंवा कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होते, याबाबत कोणतेही कारण आढळून आले नाही, असे हायकोर्टाने ही याचिका फेटाळताना म्हटले.
काय आहे प्रकरण?
बानू मुश्ताक या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्ताक विजेत्या लेखिका आहे. म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कर्नाटक सरकारने त्यांना आमंत्रित केले आहे. त्याला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. बानू मुश्ताक यांच्या हस्ते 22 सप्टेंबरला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
दसरा महोत्सव कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही. सर्व धर्मीय लोक या महोत्सवात सहभागी होतात. हा सांस्कृतिक आणि राजकीय उत्सव आहे, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. दसरा महोत्सव हा धर्मनिरपेक्ष महोत्सव नाही. हा धार्मिक महोत्सव आहे. दसरा हा आमच्या धर्माचा उत्सव आहे. त्यामुळे त्यासाठी मुस्लिम व्यक्ती नको, अशी भूमिका भाजप नेते प्रताप सिन्हा यांनी घेतली आहे.
याचिकाकर्त्यांकडूनही हायकोर्टात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दसरा महोत्सवाच्या उद्घाटनाला हिंदू परंपरेतील एक अविभाज्य अंग म्हणून घोषित करावे आणि हिंदू परंपरांनुसार केवळ हिंदू व्यक्तीद्वारेच उद्घाटन व्हावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता बानू मुश्ताक यांच्या हस्तेच उद्घाटन होणार, हे स्पष्ट झाले आहे.
कोण आहेत बानू मुश्ताक?
बानू मुश्ताक यांचा जन्म 1948 मध्ये कर्नाटकातील हसनमध्ये झाला. तिथेच त्यांचे शिक्षणही झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कन्नड माध्यम कॉन्व्हेन्ट शाळेत प्रवेश घेतला होता. कन्नड भाषेवर प्रभुत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना लेखनाचीही आवड निर्माण झाली. लहान असतानाच लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. पण हा दबाव जुगारून त्यांनी लेखन सुरूच ठेवले. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी लग्न केले. तर वयाच्या 27 व्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली. यावर्षी त्यांना बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Q1: म्हैसूर दसरा महोत्सवाचे उद्घाटन कोण करणार आहे?
A: लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Q2: याचिकेत कोणती मागणी करण्यात आली होती?
A: उद्घाटन फक्त हिंदू व्यक्तीच्या हस्ते व्हावे, अशी मागणी होती.
Q3: कोर्टाने या प्रकरणात काय निर्णय दिला?
A: कोर्टाने याचिका फेटाळून बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्घाटनाला परवानगी दिली.
Q4: बानू मुश्ताक कोण आहेत?
A: त्या कन्नड लेखिका असून 2025 मध्ये बुकर पुरस्कार विजेत्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.