बंगळूर : कर्नाटकातील (Karnataka) खाणसम्राट आणि राज्यातील राजकारणावर मोठा प्रभाव असलेले जनार्दन रेड्डी (Janardhan Reddy) यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा हादरा दिला आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची बांधणी करणाऱ्या रेड्डी यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. कर्नाटकात याच रेड्डी बंधूंच्या मदतीने भाजपने कमळ फुलविले होते. रेड्डी यांच्या नव्या पक्षामुळे मतविभाजनाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. (Karnataka's Janardhan Reddy announced a new party)
जनार्दन रेड्डी यांनी नवी दिल्लीत ‘कल्याण राज्य प्रगती पार्टी’ ची अधिकृत घोषणा केली. ते खाणसम्राट समर्थकांच्या माध्यमातून पक्षाची नोंदणी करणार आहेत. येत्या बुधवारी (ता. १४ डिसेंबर) गंगावतीत जनार्दन रेड्डी भव्य मिरवणुकीने प्रवेश करणार आहेत. पक्षनोंदणी व पक्षाचे चिन्ह मिळाल्यानंतर रेड्डी गंगावतीत प्रवेश करतील.
रेड्डी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. परंतु ते आपल्या निर्णयापासून हटले नाहीत, तर भाजपला काही जिल्ह्यांत फटका बसण्याची चर्चा आहे. रेड्डींचा नवा पक्ष राज्यातील ८ ते १० जिल्ह्यांत उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी २५ ते ३० हिंदू नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१३ च्या निवडणुकीत याच जनार्दन रेड्डींविरोधात प्रचार करणाऱ्या काँग्रेसला सत्ता काबीज करण्यात यश आले. त्यामुळे रेड्डी यांना पक्षात परत आणून त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, या संभ्रमात भाजप आहे.
जनार्दन रेड्डी यांनी गंगावती विधानसभा मतदारसंघात हजेरी लावून तेथूनच उमेदवारीची मागणी केली होती. भाजपकडून त्यांच्या मागणीचा अद्याप विचार झालेला नाही. त्यामुळे रेड्डी यांनी नवा पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. स्वतंत्र पक्षातून रेड्डी यांनी निवडणूक लढविल्यास भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात भाजपची बांधणी करणाऱ्या नेत्यांपैकी रेड्डी हे एक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.