Kerala Amma Manasu : मातांच्या मानसिक आरोग्याची तपासणी, केरळच्या ‘अम्मा मानसू’ची जगभर चर्चा ; WEF ने ठरवले आदर्श मॉडेल

Kerala Amma Manasu : सध्या जागतिक पातळीवर महिलांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात येते. परंतु केरळने Amma Manasu च्या रुपाने एक नवा मार्ग दाखवला आहे.
Kerala Amma Manasu
Kerala Amma Manasu Representational Image
Published on
Updated on

Kerala Amma Manasu : मातांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या केरळममधील 'अम्मा मानसू' मोहिमेचे जागतिक आर्थिक मंचाने (डब्लूईएफ) कौतुक केले आहे. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात नैराश्याच्या तपासणीला नियमित मातृ आरोग्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम एक आदर्श मॉडेल असल्याचे मंचाने म्हटले आहे.

जागतिक पातळीवर सध्या महिलांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात येते. निदान आणि फॉलो-अप सेवांमधील त्रुटी अद्याप कायम असताना केरळम सरकारने मात्र या आघाडीवर मोठी प्रगती केल्याचे हा अहवाल सांगतो.

'अम्मा मानसू' (आईचे मन) हा केरळममध्ये राबविण्यात येणारा मानसिक आरोग्य उपक्रम असून, यात मातेच्या मानसिक आरोग्य तपासणाली विशेष प्राधान्य दिले जाते. नियमित प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात काळजीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. 'मॅककिन्से हेल्थ इन्स्टिट्यूट' (एमएचआय) च्या सहकार्याने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आरोग्य सेवा वितरणातील त्रुटी दूर करून महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने हा एक सर्वसमावेशक आराखडा असल्याचे सांगण्यात आले.

महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास २०४० पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत वार्षिक किमान एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरची भर पडू शकते. कमकुवत आरोग्यामुळे महिलांच्या आयुष्यातील अनेक वर्षे वाया जाण्याचा धोका असतो. तो या माध्यमातून टाळता येऊ शकेल. कार्यबळातील त्यांचा सहभाग वाढल्यास उत्पादकतेमध्ये सुधारणा होईल. चांगल्या आरोग्याचे रुपांतर हे मजबूत अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महिलांचे आयुष्य वाया

कमकुवत आरोग्यामुळे पुरुषाच्या तुलनेमध्ये महिला त्यांच्या आयुष्यातील २५ टक्क्यांपेक्षाही अधिक कालावधी गमावत असल्याचे दिसून आले आहे. अपुऱ्या आरोग्य सेवा देखील यामागचे एक मोठे कारण आहे. आरोग्य सेवा वितरणात त्रुटी आढळून आल्या आहेत. कर्करोग, मानसिक आरोग्य आणि हृदयविकाराच्या जोखमींसारख्या आजारांच्याबाबतीत तपासणी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून येते. अनेकदा चुकीचे निदान झाल्याने उपचारामध्ये त्रुटी राहतात.

मानसिक विकारांकडे दुर्लक्ष

भारतामध्ये माता आणि अर्भक यांच्यादृष्टीने मानसिक विकार ही एक गंभीर समस्या आहे परंतु त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. केरळमला ही मोहीम राबविताना जे अनुभव आले त्याचा समावेश राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये करण्यात येईल. इतर राज्यांमध्येही या एकात्मिक मातृ मानसिक आरोग्य मॉडेलची अंमलबजावणी करण्याचा विचार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com