काँग्रेसला आणखी एक झटका; माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला AICC चा राजीनामा

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
Congress
CongressFile photo

तिरूअनंतपुरम : गोव्याच्या (Goa) माजी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. या धक्क्यातून अद्याप काँग्रेस सावरलेली नसतानाच केरळमधून आणखी एका नेत्याच्या राजीनाम्याचं वृत्त आहे. केरळ काँग्रेसचे (Kerala Congress) माजी अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन (V. M. Sudheeran ) यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी केरळ काँग्रेसच्या राजकीय कार्यक्रम समितीचा राजीनामा दिला होता.

सुधीरन हे केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांनी AICC चा राजीनामा दिल्यानं पक्षाला मोठा झटका बसला आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच हा राजीनामा पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सुधारन हे प्रदेश कार्यकारिणीवर नाराज असल्याची चर्चा आहे. सुधारन यांनी अद्याप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही.

Congress
काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्री पक्षाला ठोकणार रामराम

त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यानच त्यांनी हे पाऊल उचललं आहे. AICC चे महासचिव व केरळचे पभारी तारिक अन्वर सध्या केरळमध्ये आहे. सुधीरन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे अन्वर यांनी सांगितले. राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी सुधीरन यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

सुधीरन यांची केरळ संघटनेसंबंधी काही तक्रारी आहेत. पण त्यांच्या भेटीनंतर सतीशन यांनी त्यांची मनधरणी करणं कठीण असल्याचं सांगितलं. सुधीरन यांनी अजून आपल्या राजीनाम्याचं कारण सांगितलं नसलं तरी प्रदेश काँग्रेसमधील फेरबदलाच्या प्रक्रियेवर ते नाराज असल्याचे समजते. सुधाकरन यांच्या कार्यशैलीमुळं त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Congress
भाजपच्या उपाध्यक्षांवर हल्ला; सुरक्षारक्षकांनी पिस्तूल रोखूनही जमाव आक्रमक

दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फेलेरो यांनी सोमवारी पक्षाला रामराम ठोकला. ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. फेलेरो हे गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना काही दिवसांपूर्वीच गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. पण आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com