येडियुरप्पांची मुलानेच दिशाभूल केली! लिंगायत मठाधिपतींचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून येडियुरप्पा मुक्त झाल्यानंतरमहिनाभरातच राज्यातील लिंगायत समाजाने भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
lingayat seer says son misguided b s yediyurappa
lingayat seer says son misguided b s yediyurappa
Published on: 
Updated on: 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून येडियुरप्पा मुक्त होऊन महिनाभरातच राज्यातील लिंगायत समाजाने (Lingayat Community) भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येडियुरप्पांची त्यांच्या मुलानेच दिशाभूत केली, असा गौप्यस्फोटही लिंगायत मठाधिपतींनी केला आहे.  

लिंगायत समाजात बोम्मई यांना येडियुरप्पांएवढी मान्यता नाही. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडताच या समाजाने सरकारची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. भाजपची व्होटबँक असलेल्या या समाजाने आणखी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. सहा महिन्यांपूर्वीच लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात आले होते. आता यासाठी आंदोलनाचीही तयारी करण्यात आली आहे. राज्यातील लिंगायत समाजामध्ये पंचमशाली हे 70 टक्के आहेत. सरकारने 2 अ ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली असून, यासाठी महिनाभर आंदोलन केले जाणार आहे.
 
लिंगायत मठाधिपती जय मृत्यूंजय स्वामी म्हणाले की, येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदी असताना आम्ही आरक्षणासाठी 500 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. परंतु, काही जणांनी येडियुरप्पांची दिशाभूल केली आहे. यात त्यांचे पुत्र विजयेंद्र यांचा प्रामुख्याने समावेश होता. आमचा समाज आधी येडियुरप्पांच्या पाठीशी होता परंतु, आता आम्ही त्यांना पाठिंबा देणे बंद केले आहे. सरकारने आम्हाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. 

येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यामागे त्यांचे पुत्र कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. येडियुरप्पांचे सर्व निर्णय विजयेंद्र घेत होते, असा आरोप अनेक मंत्री करीत होते. विजयेंद्र हे सुपरसीएम बनल्याची टीकाही काही मंत्र्यांनी केली होती. अखेर पक्ष नेतृत्वाने याची दखल घेत येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होण्यास भाग पाडले होते. आता लिंगायत मठाधिपतींनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. 

राज्यातील 6.5 कोटी लोकसंख्येत लिंगायत समाज 80 लाख आहे. सध्या लिंगायत समाजाला 5 टक्के आरक्षण असून, ते वाढवण्याची मागणी होत आहे. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्यानंतर त्यांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना पाठीशी उभे केले होते. मुख्यमंत्र्यांना हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल, असा दबाव त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणला होता. त्यावेळी येडियुरप्पांनी लिंगायत कार्ड खेळले होते. राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. 

पक्ष नेतृत्वाने राजीनाम्यासाठी दबाव आणल्यानंतर येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला होता. अखेर पक्ष नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याने ते पायउतार झाले होते. परंतु, मुख्यमंत्रिपदी बोम्मई हा लिंगायत चेहराच निवडण्यात आला. येडियुरप्पांच्या पसंतीनेच बोम्मईंची निवड झाली होती. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com