सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या काही दिवस आधी म्हणजे पाच फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आगामी लोकसभेचे आपले टार्गेट जाहीर केले होते. ते फक्त म्हणाले होते की 'अब की बार...'आणि त्यांच्या खासदारांनी 'चार सौ पार'ची घोषणा (BJP Slogan Abki Baar 400 Paar) दिली होती. ही घोषणा भाजपच्या निवडणूक प्रचाराचा मंत्र बनली आहे.
भाजपला टक्कर देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने शक्य तेवढ्या जागांवर पक्षाला रोखण्याचे व सत्तावापसीचे गणित बिघडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवार हे ५० हजारांपेक्षा कमी मताधिक्याने जिंकलेले आहेत अशा सुमारे चाळीस मतदारसंघांवर विशेष लक्ष इंडिया आघाडीने केंद्रित केले आहे.
यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही जागांचा समावेश असल्याचे समजते.उत्तर प्रदेशातील सहा, झारखंडमधील दोन, पश्चिम बंगालमधील चार कर्नाटकमधील दोन आणि छत्तीसगड, हरियाना, बिहार व पंजाबमधील प्रत्येकी एका जागेवर ‘इंडिया’ आघाडीने केंद्रित केले आहे.
तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीत नसलेल्या परंतु भाजपविरोधात लढणाऱ्या बहुजन समाज पक्षालाही(बसप) मागील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ३० हजारांपेक्षा कमी मतांनी सहा जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यातील मछलीशहर ही जागा तर भाजपने अवघ्या १८१ मतांनी तर मेरठची जागा ४७२९ मतांनी जिंकली होती.
‘बसप’ स्वतंत्रपणे उत्तरप्रदेशात निवडणूक लढवीत आहे. या पक्षाच्या प्रभावाखालील मतदारसंघांमध्ये भाजपविरोधात आयत्यावेळी वेगळा विचार करता येईल काय? याबाबतही ‘इंडिया’ आघाडी चाचपणी करीत आहे.
काँग्रेसला भाजपकडून पराभव पत्करावा लागलेल्या पाच जागा अशा आहेत, ज्यात भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य दहा हजारांहून कमी आहे. त्यामध्ये झारखंडमधील खुंटी, कर्नाटकमधील चामराज नगर, हरियानातील रोहतक यासह केंद्रशासित दीव दमणच्या जागेचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील कन्नौज, चंदोली, बलिया, बदायूँ, फिरोजाबाद आणि कोशंबी या भाजपकडून ४० हजारापेक्षा कमी मतांनी गमावलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यातील चार मतदारसंघांमध्ये तर पराभवाचा फरक २० हजारापेक्षाही कमी मतांचा होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार वर्धमान- दुर्गापूर, झारग्राम, बराकपूर व बालूरघाट या मतदारसंघांमध्ये ३५ हजारांपेक्षाही कमी मतांनी भाजपकडून हरले होते. त्यामुळे ‘तृणमूल’ने या मतदारसंघांकडे विशेष लक्ष दिले आहे.
भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्तावापसीसाठी स्वबळावर ३७० जागा तर ‘एनडीए’ आघाडीसाठी ४०० हून अधिक जागा जिंकण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत मते मिळविण्याचे उद्दिष्ट भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. लहान पक्षांना आणि प्रभावशाली चेहऱ्यांनाही सोबत घेण्याची आखणी करण्यात आली आहे.
'चार सौ पार'हेतू प्रत्यक्षात उतरवणं भाजपला किती अवघड आहे, हे पंतप्रधान आणि त्यांच्या कोअर टीमला ठाऊक आहे. कारण दुसरीकडे मोदींच्या हातातून सत्ता हिसकावून घेण्यासाठी 'इंडिया' आघाडीने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे मोदी आणि भाजपच्या चार सौ पारच्या स्वप्नाला धक्का बसणार की नाही हे चार जूनला समजेल.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.